पाण्याच्या समस्येला अधिकारीच जबाबदार
By Admin | Updated: April 8, 2017 04:39 IST2017-04-08T04:39:52+5:302017-04-08T04:39:52+5:30
अंबरनाथमधील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी अंबरनाथमध्ये आल्या

पाण्याच्या समस्येला अधिकारीच जबाबदार
अंबरनाथ : अंबरनाथमधील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी अंबरनाथमध्ये आल्या होत्या. अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची माहिती घेतली जात असतानाच अंबरनाथमधील काँग्रेस नगरसेवकांनी थेट कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयात आल्याचे कळताच पाणीसमस्येने त्रस्त असलेल्या इतर पक्षांच्या नगरसेवकांनीही प्राधिकरणाचे कार्यालय गाठले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीसमस्येसोबतच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणी येथील पाणीप्रकल्पाची माहिती घेण्यासाठी अधीक्षक अभियंता मनीषा पालांडे या अंबरनाथमध्ये आल्या होत्या. कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात यासंदर्भात बैठक सुरू होती. याच वेळी पाणीसमस्येची आणि दोन वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या योजनेची तक्रार करण्यासाठी नगरसेवक प्रदीप पाटील, उमेश पाटील, चरण रसाळ, विलास जोशी हे प्राधिकरणाच्या कार्यालयात आले होते. या वेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने या सर्व नगरसेवकांनी पालांडे यांची भेट घेत त्यांच्यापुढे तक्रार केली.
वरिष्ठ अधिकारी आल्याचे कळताच पाणीपुरवठा सभापती रेश्मा गुडेकर आणि भाजपाचे नगरसेवक वसंत पाटील हेही अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले. या वेळी सर्व नगरसेवकांनी चिंचपाडा येथील पाण्याच्या टाकीची आणि नवीन भेंडीपाडा येथून येणाऱ्या जलवाहिनीच्या रखडलेल्या कामाची तक्रार पालांडे यांच्याकडे केली.
दोन वर्षे हे काम रखडल्यानेच पश्चिम भागाला पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी अन्य अधिकारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>पाणी विकतात
प्राधिकरणाचे स्थानिक अधिकारी हे काही बिल्डरांना पाणी विकत असल्याचा आरोप या वेळी केला. तसेच पाणीचोरीचे प्रकार उघड केल्यावरही त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. रात्री १२ नंतर बिल्डरांना पाणी पुरवण्याचे काम अधिकारी करत असल्याचे पाटील यांनी पालांडे यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात पालांडे यांनी लागलीच चौकशी करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे.
शहरातील पाण्याचे पुन्हा नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. जलवाहिनी टाकण्याचे थांबलेले काम त्वरित सुरू करण्यासाठी योग्य ते आदेश येत्या काही दिवसांत निश्चित दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.