नागनदी, डम्पिंग यार्डचे प्रस्ताव दोन महिन्यात द्या
By Admin | Updated: January 30, 2015 00:55 IST2015-01-30T00:55:22+5:302015-01-30T00:55:22+5:30
नागपूरमधील नागनदीचे संवर्धन आणि डम्पिंग यार्ड इतरत्र हलविण्यासंदर्भातील प्रस्ताव दोन महिन्यात संबंधित यंत्रणेने राज्य शासनाकडे पाठवावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू,

नागनदी, डम्पिंग यार्डचे प्रस्ताव दोन महिन्यात द्या
रामदास कदम : विलंब झाल्यास कारवाई
नागपूर: नागपूरमधील नागनदीचे संवर्धन आणि डम्पिंग यार्ड इतरत्र हलविण्यासंदर्भातील प्रस्ताव दोन महिन्यात संबंधित यंत्रणेने राज्य शासनाकडे पाठवावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला.
नागपूरचे डम्पिंग यार्ड, नागनदी संवर्धन यासंदर्भात कदम यांनी गुरुवारी रविभवनमध्ये महापालिका,नागपूर सुधार प्रन्यास आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली व विविध योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना कदम म्हणाले की, नागनदी आणि डम्पिंग यार्डच्या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेने दोन महिन्यात सादर करावे,यात विलंब झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नागनदी संवर्धनाच्या संदर्भात महापालिकेने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यात काही त्रुटी राहिल्याने तो परत आला आहे. हा सुधारित प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे पाठवावा. त्यानंतर याचा आपण स्वत: केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. डम्पिग यार्डच्या संदर्भात कदम म्हणाले की, कचरा साठवणुकीचा प्रश्न राज्यात सर्व मोठ्या शहरात गंभीर रुप धारण करीत आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नागपुरातील डम्पिंग यार्ड इतरत्र हलविण्याची नागरिकांची मागणी आहे. यासंदर्भात नवीन जागेचा शोध घेतला जात आहे. याविषयीचा सर्वसमावेशक प्रस्ताव दोन महिन्यात सादर करण्यास सांगितले आहे. पर्यावरण आणि नद्या, तलाव संवर्धनासाठी महापालिकांनी २५ टक्के निधी राखून ठेवावा,असे निर्देशही अधिकाऱ्यांना दिल्याचे कदम म्हणाले.
बैठकीत पर्यावरणावर चर्चा
नागपूर शहराच्या पर्यावरण संतुलनासाठी महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल १५ मार्चपर्यंत शासनाकडे सादर करावा, असे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आढावा बैठकीत दिले.
शहरातील गांधीसागर, पांढराबोडी, सोनेगाव, फुटाळा, अंबाझरी तलावांच्या संवर्धनासाठी कलेल्या उपाययोजनांचची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी कदम यांना दिली. नागनदीचे प्रदुषण कमी करण्यासाठी महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित केले. महाजन्कोच्या मदतीने १३० द.ल.लिटर क्षमतेचे घरगुती सांडपाणी प्रक्रिया संयत्रणेचे काम प्रगतीपथावर आहे. महापालिकेने २०२० पर्यंत शहरातील सांडपाण्यावर विविध ठिकाणी प्रक्रिया करण्याचे प्रस्तावित केले आहे. नवीन डंम्पिंग यार्ड बेलसारी आणि तीतूर येथे प्रस्तावित आहे. त्यासाठी ९०० हेक्टर जागा लागणार आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन कंपनी नियुक्त केली जाणार असल्याचे हर्डीकर यांनी यावेळी सांगितले.
बैठकीला विभागीय आयुक्त अनुप कुमार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एन.एच. शिवानगी,उपप्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
पर्यावरण धोरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पर्यावरण धोरणाबाबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू,असे कदम यांनी सांगितले. यापूर्वीच्या धोरणात काही त्रुटी होत्या. त्या दूर करण्याची सूचना आपणच मुख्यमंत्र्यांना केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.