मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: September 10, 2014 00:52 IST2014-09-10T00:52:54+5:302014-09-10T00:52:54+5:30
शहरात डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी महापालिका प्रशासन स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करीत आहे. यामुळे महापौर प्रवीण दटके संतप्त झाले असून मंगळवारी त्यांनी प्रशासनाला फटकारले.

मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा
डेंग्यूवरून महापौर संतप्त : प्रशासनाला फटकारले
नागपूर : शहरात डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी महापालिका प्रशासन स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करीत आहे. यामुळे महापौर प्रवीण दटके संतप्त झाले असून मंगळवारी त्यांनी प्रशासनाला फटकारले. डेंग्यूमुळे कुणाचा मृत्यू झाला तर त्यासाठी संबंधित जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याला दोषी मानले जाईल व पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
‘उपराजधानीत डेंग्यूचा प्रकोप’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करीत महापालिकेची यंत्रणा कशी कुचकामी ठरली याकडे लक्ष वेधले होते. महापौर दटके यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी या संदर्भात मंगळवारी बैठक घेत डेंग्यू व फायलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी तत्काळ ऐवजदारांची नियुक्ती करण्याचे निर्देश आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांना दिले. यानंतर पत्रकारांशी बोलताना महापौर दटके यांनी सांगितले की, प्रशासकीय पातळीवर दुर्लक्ष करणाऱ्याविरोधातही कारवाई केली जाईल. केलेल्या उपाययोजनांबाबत दर आठवड्याला आढावा बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. काही झोनमधून संधिग्ध रुग्णांची आकडेवारी घेतली असता त्यात तफावत दिसून आली. ही गंभीर बाब असल्यामुळे यात दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले.
राज्य सरकारने जयश्री थोटे यांना मलेरिया-फायलेरिया अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. महापालिकेतर्फे डॉ. अशोक उरकुडे हे या विभागाचे काम पाहतात. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे डेंग्यूचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या कामात अडथळे येत आहेत.(प्रतिनिधी)
असे आहेत निर्देश
मलेरिया-फायलेरिया विभागातील कर्मचारी व अधिकारी यांचे अतिरिक्त काम काढून त्यांना फक्त डेंग्यू निर्मूलनाची जबाबदारी देण्यात यावी.
खासगी व सरकारी दवाखान्यांना नोटीस बजावून दररोजचा अहवाल देण्याची सक्ती करावी.
मेयो, मेडिकल व डागा हॉस्पिटलमधील डेंग्यू व मलेरिया रुग्णांची आकडेवारी गोळा करण्यासाठी महापालिकेतर्फे दररोज एक कर्मचारी तेथे जाईल.
केंद्रीय, राज्य स्तरावरील शासकीय कार्यालयांचा तसेच वसाहतींचा दौरा महापालिकेचे कर्मचारी करतील.
सर्व फायलेरिया निरीक्षकांनी स्थानिक नगरसेवकांशी समन्वय साधावा. यानंतर झोनल अधिकाऱ्यांना साप्ताहिक अहवाल द्यावा.