‘द्रौपदी विहार’च्या मालकावर गुन्हा
By Admin | Updated: June 8, 2016 02:34 IST2016-06-08T02:34:25+5:302016-06-08T02:34:25+5:30
डोंबिवली पश्चिमेतील देवीचौकातील ‘द्रौपदी विहार’ ही धोकादायक इमारत गुरुवारी खचली होती.
_ns.jpg)
‘द्रौपदी विहार’च्या मालकावर गुन्हा
कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील देवीचौकातील ‘द्रौपदी विहार’ ही धोकादायक इमारत गुरुवारी खचली होती. या इमारतीची स्वत:च्या मर्जीने अयोग्य पद्धतीने दुरुस्ती करून रहिवाशांना बेघर करण्यास तसेच त्यांची सुरक्षितता धोक्यात आणल्याच्या आरोपाखाली इमारतीचे मालक अभिमन्यू विष्णू जोशी यांच्याविरोधात येथील विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केडीएमसीचे ‘ह’ प्रभागअधिकारी परशुराम कुमावत यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
१९८४ मधील ‘द्रोपदी विहार’ या इमारतीच्या मागील भिंतीचा भाग खचला तसेच खांबही वाकला. ते लक्षात येताच इमारतीतील २५ कुटुंबांना तत्काळ बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. असे असले तरी येथे भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
इमारतीचे मालक जोशी यांनी एमआयडीसीतील शक्तीशाली स्फोटात इमारतीला हादरे बसले होते. त्यातच ही इमारत खचल्याचे कारण दिले होते. परंतु, रहिवाशांनी इमारत मालकाचा दावा खोडून काढला होता. मालकाच्या संस्थेच्या शाळेची डागडुज्जी सुरू होती. त्यामुळेच इमारत खचल्याची घटना घडल्याचे येथील रहिवाशांनी ‘लोकमत’ला सांगितले.
>लवकरच हातोडा
स्ट्रक्चरल आॅडिटच्या अहवालात इमारत कमकुवत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ती तोडावीच लागणार आहे. केडीएमसीने मंगळवारपासून याअनुषंगाने कार्यवाहीला सुरुवात केल्याची माहिती ‘ह’ प्रभाग अधिकारी कुमावत यांनी दिली. इमारतीचे पत्रे काढले आहेत.