अश्लील संदेश तरुणास भोवला
By Admin | Updated: July 4, 2015 03:24 IST2015-07-04T03:24:43+5:302015-07-04T03:24:43+5:30
आॅर्कुटवर झालेल्या मैत्रीनंतर तरुणीला ईमेलवर अश्लील संभाषण, फोटो पाठविणाऱ्या मॅकेनिकल इंजिनीअर तरुणाला बुधवारी न्यायालयाने ३ महिन्यांचा कारावास व दंड ठोठावला.

अश्लील संदेश तरुणास भोवला
मुंबई : आॅर्कुटवर झालेल्या मैत्रीनंतर तरुणीला ईमेलवर अश्लील संभाषण, फोटो पाठविणाऱ्या मॅकेनिकल इंजिनीअर तरुणाला बुधवारी न्यायालयाने ३ महिन्यांचा कारावास व दंड ठोठावला. अशा प्रकारे महिलांना मनस्ताप दिल्याबद्दल (सायबर स्टॉकिंग) आरोपीला शिक्षा झालेले राज्यातले हे पहिलेच प्रकरण आहे.
योगेश प्रभू असे आरोपीचे नाव असून, तो नवी मुंबईचा रहिवासी आहे. २००९मध्ये ३३ वर्षांच्या तरुणीशी त्याची आॅर्कुटच्या माध्यमातून ओळख झाली. सुरुवातीच्या संवादानंतर दोघांच्या गाठीभेटी झाल्या. जसजशी ओळख वाढत गेली तसतसा योगेशचा स्वभाव तिला खटकू लागला. त्यामुळे तिने योगेशला आॅर्कुट अकाउंटमधून काढून टाकले.
या घटनेच्या काही दिवसांनंतर तरुणीच्या आयडीवर अनोळखी आयडीवरून अश्लील मजकुराचे ईमेल येऊ लागले. सुरुवातीला तिने
दुर्लक्ष केले. मात्र या अश्लील ईमेलचे प्रमाण वाढू लागल्याने तिने गुन्हे शाखेचे तत्कालीन सहआयुक्त राकेश मारिया यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. मारिया यांनी तत्काळ या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश सायबर सेलला दिले.
त्यानुसार शिवाजीपार्क पोलीस ठाण्यात भादंवि, माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. एसीपी नंदकिशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद पवार व पथकाने तपास सुरू केला. तपासात अश्लील मजकूर, फोटो धाडणाऱ्या आयडीचा आयपी अॅड्रेस पथकाने शोधला. हा आयपी अॅड्रेस असलेल्या कंपनीत पथकाने चौकशी केली तेव्हा योगेश प्रभूचे नाव समोर आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत योगेशने अश्लील ईमेल पाठवल्याची कबुली दिली. त्याने तयार केलेल्या बोगस ईमेल आयडीची तपासणी झाली तेव्हा सेंट बॉक्समध्ये ते सर्व ईमेल पोलिसांना आढळले.
अटकेनंतर १० दिवस पोलीस कोठडीत पाठविण्यात आलेल्या प्रभूविरोधात सायबर पोलिसांनी सप्टेंबर २००९मध्ये आरोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सायबर
सेल व सरकारी वकिलांनी प्रभूविरोधातील पुराव्यांची साखळी न्यायालयासमोर सादर केली. खटल्याची सुनावणी या वर्षी ३ जून रोजी पूर्ण झाली. शुक्रवारी न्यायालयाने निकालवाचन पूर्ण करून प्रभूला शिक्षा ठोठावली.
सायबर क्षेत्रात स्त्रीयांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे एखाद्या महिलेला अश्लील मजकूर, छायाचित्र पाठविण्याच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा झाल्याने जनतेत, स्त्रियांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तसेच असे गुन्हे करणाऱ्यांना नक्कीच वचक बसेल.
- धनंजय कुलकर्णी,
डीसीपी, मुंबई गुन्हे शाखा