आरक्षणासाठी एकवटले ओबीसी!
By Admin | Updated: December 22, 2016 17:13 IST2016-12-22T17:13:38+5:302016-12-22T17:13:38+5:30
लोकसंख्या ५२ टक्के असलेल्या इतर मागासवर्गीयांना (ओबीसी ) ५० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी

आरक्षणासाठी एकवटले ओबीसी!
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 22 - लोकसंख्या ५२ टक्के असलेल्या इतर मागासवर्गीयांना (ओबीसी ) ५० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी एकत्र आलेल्या ओबीसी समाजबांधवांनी गुरुवारी महामोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
सन १९३१ च्या जनगणनेनुसार ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ह्यओबीसींह्णना केवळ २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. तामिळनाडूमध्ये ओबीसींना ५० टक्के जागा आहेत. त्या धर्तीवर देशात ओबीसींना ५० टक्के आरक्षण देण्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि २०११ नुसार ओबीसींची जनगणना जाहीर करण्यात यावी यासह एकूण १८ मागण्यांसाठी ओबीसी समाज जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.
गुरुवारी दुपारी १ वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावरुन काढण्यात आलेला ओबीसी महामोर्चा टॉवर चौक, बसस्थानक, गांधी मार्ग, पंचायत समितीसमोरुन मार्गक्रमण करित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. त्यानंतर आठ युवती आणि पाच युवकांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सादर करण्यात आले. त्यामध्ये पंतप्रधानांना सादर करावयाचे निवेदन युवतींच्यावतीने तर मुख्यमंत्र्यांना सादर करावयाचे निवेदन युवकांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले. या महामोर्चात जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील विविध जातींमधील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.