ओबीसी नेते हनुमंत उपरे यांचे निधन
By Admin | Updated: March 20, 2015 01:43 IST2015-03-20T01:43:51+5:302015-03-20T01:43:51+5:30
ओबीसी, चलो बुद्ध की ओर अभियानाचे प्रणेते सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक तथा परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते हनुमंत उपरे उर्फ काका यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले.

ओबीसी नेते हनुमंत उपरे यांचे निधन
बीड : ओबीसी, चलो बुद्ध की ओर अभियानाचे प्रणेते सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक तथा परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते हनुमंत उपरे उर्फ काका यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कमलबाई, पुत्र संतोष, संदीप,
२ मुली, २ स्नूषा, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे ११ मार्च रोजी त्यांना औरंगाबाद येथील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. त्यांच्या डोक्यातील रक्तवाहिनी दबल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना १२ मार्च रोजी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचार सुरू असतानाच गुरुवारी सकाळी ९ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हनुमंत उपरे यांनी स्वबळावर परिवर्तनवादी चळवळीतून सामाजिक क्षेत्रात लक्षणीय ठसा उमटवला होता. गणराज बँक, पाइपनिर्मिती उद्योगातून त्यांनी औद्योगिक क्षेत्रातही वेगळेपण सिद्ध केले होते. २० वर्षांपेक्षा अधिक काळ ते भारिप बहुजन महासंघात होते. कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष अशी मोठी झेप घेत त्यांनी कार्यकर्ते जोडण्याचे काम केले होते. विखुरलेल्या ओबीसींना एकत्र आणून त्यांच्यात स्वाभिमान जागविण्याचा प्रयत्न केला होता. २०११मध्ये त्यांनी सत्यशोधक ओबीसी परिषदेची मुहूर्तमेढ रोवून परिवर्तनाची हाक दिली होती. ओबीसींना बौद्ध धम्माच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले.
३ महिन्यांपूर्वीच त्यांनी बीड येथे विद्रोही साहित्य संमेलन घेऊन वैचारिक मशाल पेटविली होती.
बौद्ध पद्धतीने आज अंत्यसंस्कार
बीडमधील एमआयडीसी परिसरातील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी ६ ते दुपारी १ वाजेदरम्यान हनुमंत उपरे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर नामलगाव येथील शेतात दुपारी २ वाजता बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अवयवदानाचा संकल्प
हनुमंत उपरे यांनी आयुष्यभर सामाजिक जाणिवांचा पुरस्कार केला. मृत्यूनंतरही हा विचार जपण्यासाठी त्यांनी अवयवदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.