मुंबई : परिचारिका संघटनांनी पदनामात बदल करण्यासह अन्य मागण्यांसाठी पुकारलेला संप गुरुवारी सातव्या दिवशी अखेर मागे घेतला. पदनामात ‘स्टाफ नर्स’ ऐवजी ‘नर्सिंग ऑफिसर’(परिचर्या अधिकारी) असा बदल करण्याची त्यांची मागणी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्य केली आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या उपाध्यक्ष हेमलता गजबे म्हणाल्या की, आमच्या मागण्या वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि सचिव धीरज कुमार यांनी मान्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. बैठकीच्या इतिवृत्तातील नोंदीनुसार आमच्या मागण्यांवर कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.” मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेतला असून, परिचारिका कामावर रूजू झाल्या आहेत. राज्यातील परिचारिकांनी गुरुवारपासून संप पुकारला होता. अखेर सात दिवसांनी सरकारने संघटनेच्या मागण्या मान्य केल्याच्या बैठकीच्या इतिवृत्ताची प्रत संघटनेला दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला. परिचारिकांच्या संपामुळे नियमित शस्त्रक्रिया बंद पडल्या होत्या. मुंबईतील जे. जे., कामा, सेंट जॉर्जेस आणि जीटी रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद होत्या. केवळ अतितत्काळ शस्त्रक्रिया करण्यात येत होत्या.
मान्य झालेल्या मागण्या > अधिपरिचारिका, परिसेविका तसेच परिचर्या महाविद्यालयातील पाठ्यनिर्देशिका वेतनश्रेणी वाढीचा प्रस्ताव वित्त विभागासमोर सादर करणार. > परिचारिकांची रिक्त पदे आणि नवनिर्मित महाविद्यालयांतील रिक्त पदे भरण्याकरिता संचालनालयाकडून बिंदुनामावली तयार करून रिक्त पदे भरणार.> केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग आणि गणवेश भत्ता देण्यासंदर्भात मंडळापुढे प्रस्ताव सादर करणार.> पाळणाघर आणि सुसज्ज चेंजिग रूम उपलब्ध करण्याबाबत संचालनालय स्तरावर बैठक घेऊन एक महिन्यात अंमलबजावणी. > निवासस्थान मिळण्याबाबत संचालनालय स्तरावर बैठक घेऊन दोन महिन्यांत अंमलबजावणी. > जीएनएम विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन वाढीबाबत संचालनालयाकडून प्रस्ताव प्राप्त करून नियमानुसार कार्यवाही.> शासनमान्य संघटनेला जागा देण्याबाबत कार्यवाही करण्याचे सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या अधीक्षकांना निर्देश.