‘दाभोळ’मध्ये मृतांची संख्या पाच

By Admin | Updated: June 24, 2015 00:56 IST2015-06-24T00:54:05+5:302015-06-24T00:56:31+5:30

चारही मृतदेह सापडले : मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत; घर बांधणीसाठी एक लाख

The number of dead in 'Dabhol' is five | ‘दाभोळ’मध्ये मृतांची संख्या पाच

‘दाभोळ’मध्ये मृतांची संख्या पाच

दापोली : तालुक्यातील दाभोळ टेमकरवाडीतील खचलेल्या डोंगराखाली गाडले गेलेले उर्वरित चारही मृतदेह मंगळवारी शोध पथकाच्या हाती लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थ, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, प्रशासकीय यंत्रणेच्या तब्बल ४0 तासांच्या अखंड शोध मोहिमेनंतर हे मृतदेह हाती लागले. या दुर्घटनेमुळे दाभोळ गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासन धोरणानुसार प्रत्येकी चार लाख रुपये मदत, तसेच घर बांधणीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सोमवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास दाभोळ टेमकरवाडीत दरड कोसळून त्याखाली तीन घरे गाडली गेली. त्यातील एका घरामध्ये कोणीही राहत नव्हते. उर्वरित दोन घरांमधील पाचजण घरांसह मातीमध्ये गाडले गेले. त्यात कमलाकर सहदेव महाडिक, कमलाक्षी कमलाकर महाडिक, दिनकर सहदेव महाडिक, मधुकर गोपीनाथ महाडिक, मधुमालती मधुकर महाडिक यांचा समावेश होता. सोमवारी पहाटे पाच वाजल्यांपासूनच माती बाजूला करून शोधकार्य सुरू झाले होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास दिनकर महाडिक यांचा मृतदेह सापडला. मात्र, त्यानंतर बराच वेळ खूप मोठ्या प्रमाणात माती उपसूनही काहीच हाती लागत नव्हते.
सोमवारी रात्रीही अजिबात न थांबता शोधमोहीम सुरू होती. सोमवारची पहाट थरकाप उडवणारी असल्यामुळे सोमवारी रात्री सगळी टेमकरवाडी जागीच होती. मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कमलाकर महाडिक (वय ६२) आणि त्यांची पत्नी कमलाक्षी (५५) यांचे मृतदेह सापडले. आणखी दोघेजण मातीखाली अडकले असल्याने शोधमोहीम अखंड सुरू होती. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मधुकर महाडिक यांचा आणि त्यानंतर दीड ते दोन तासांतच त्यांची पत्नी मधुमालती मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी
चार लाखांची मदत
रत्नागिरी : दाभोळ टेमकरवाडीतील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासन धोरणानुसार प्रत्येकी चार लाख रुपये मदत, तसेच घर बांधणीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
२२ जून २०१५ रोजी पहाटे झालेल्या या दुर्घटनेत सहाजण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचा अंदाज होता. आतापर्यंत त्यातील पाच मृतदेह सापडले आहेत. या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येक मृत व्यक्तीमागे चार लाखांची शासकीय मदत दिली जाणार आहे. तसेच संपूर्ण घराचे नुकसान झालेल्यांना एक लाख एक हजार ९०० रुपयांची मदत दिली जाणार आहे.
दाभोळ येथील घटनास्थळी अजूनही दरड उपसण्याचे काम सुरू आहे. त्याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे ३६ जवान, ३० पोलीस कर्मचारी तसेच दापोली नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचे कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते व नागरिक मदत कार्यात सहभागी झाले आहेत.
शोध व बचाव कार्यासाठी घटनास्थळी चार पोकलेन, पाच जेसीबी, सहा ट्रॅक्टर व दोन रुग्णवाहिका कार्यरत आहेत. घटनास्थळी दापोलीचे प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मंडल अधिकारी, मंडळातील सर्व तलाठी उपस्थित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: The number of dead in 'Dabhol' is five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.