राज्यात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होण्याची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 06:30 AM2020-07-28T06:30:19+5:302020-07-28T06:30:36+5:30

दिवसभरात ७ हजार ९२४ नवे बाधित; ८,७०६ जण कोरोनामुक्त होऊन परतले घरी

number of cured corona patient more than new patients in Maharashtra first time | राज्यात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होण्याची संख्या वाढली

राज्यात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होण्याची संख्या वाढली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाचा (कोविड-१९) प्रादुर्भाव हळूहळू नियंत्रणात येताना दिसत आहे. सोमवारी पहिल्यांदाच दैनंदिन रुग्ण निदानापेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ७ हजार ९२४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर तब्बल ८ हजार ७०६ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७.८४ टक्के असून मृत्युदर ३.६२ टक्के आहे.


पुणे जिल्ह्यात देशातील सर्वाधिक ४८,६७२ सक्रिय रुग्ण आहेत, तर ३४,४७१ सक्रिय रुग्णांसह ठाणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईतील रुग्णसंख्या कमी होऊन ती २१,८१२ एवढी झाली आहे. राज्यात दिवसभरात ७ हजार ९२४ रुग्ण व २२७ मृत्यू झाले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ८३ हजार ७२३ असून मृतांचा आकडा १३ हजार ८८३ इतका आहे.


राज्यात दिवसभरात नोंद झालेल्या २२७ मृत्यूंमध्ये मुंबई ३९, ठाणे ४, ठाणे मनपा ९, नवी मुंबई मनपा ७, कल्याण-डोंबिवली मनपा ११, उल्हासनगर मनपा ३, भिवंडी-निजामपूर मनपा ५, मीरा-भार्इंदर मनपा १, वसई-विरार मनपा ३, रायगड २८, पनवेल मनपा १९, नाशिक ३, नाशिक मनपा २, अहमदनगर २, धुळे १, जळगाव ४, जळगाव मनपा २, नंदूरबार ३, पुणे ११, पुणे मनपा १९, पिंपरी-चिंचवड मनपा १५, सोलापूर २, सोलापूर मनपा १, सातारा ४, कोल्हापूर ७, कोल्हापूर मनपा १, सांगली-मिरज-कुपवाड मनपा २, रत्नागिरी २, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ४, हिंगोली १, लातूर १, लातूर मनपा १, उस्मानाबाद १, बीड २, नांदेड १, नांदेड मनपा १, अमरावती मनपा १, नागपूर मनपा २ आणि अन्य राज्य व देशातील एका रुग्णाचा समावेश आहे.
सध्या राज्यात ९ लाख २२ हजार ६३७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात तर ४४ हजार १३६ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

मुंबईत कोरोनाचे आणखी ३९ बळी
मुंबईत दिवसभरात १ हजार २१ रुग्ण व ३९ मृत्यूंची नोंद झाली. शहर-उपनगरात १ लाख १० हजार १८२ रुग्ण तर ६ हजार १३२ मृत्यू झाले आहेत.मुंबईत आतापर्यंत ८१ हजार १४४ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २१ हजार ८१२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तपासण्यात आलेल्या एकूण १९ लाख २५ हजार ३९९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.९२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: number of cured corona patient more than new patients in Maharashtra first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.