डासांच्या उत्पत्तीला डबके पोषक

By Admin | Updated: November 17, 2014 01:03 IST2014-11-17T01:03:34+5:302014-11-17T01:03:34+5:30

उपराजधानीत डासांचा कहर झाला आहे. विशेषत: सायंकाळच्या वेळी या डासांचा उपद्रव वाढल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. एकीकडे डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या त्यात या वाढत्या डासांमुळे

The nuggets of mosquitoes originated | डासांच्या उत्पत्तीला डबके पोषक

डासांच्या उत्पत्तीला डबके पोषक

महानगरपालिकेचे दुर्लक्ष : डेंग्यूवर नियंत्रण कसे मिळणार?
नागपूर : उपराजधानीत डासांचा कहर झाला आहे. विशेषत: सायंकाळच्या वेळी या डासांचा उपद्रव वाढल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. एकीकडे डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या त्यात या वाढत्या डासांमुळे भीतीचे वातावरण आहे. डेंग्यूच्या नियंत्रणावर महानगरपालिका घराघरांची झाडाझडती घेत असलीतरी वस्त्या-वस्त्यांमधील पाण्याच्या डबक्यांकडे दुर्लक्ष केले आहे. पॉश वसाहतींसोबतच झोपडपट्ट्यांमधील हे डबके डासांच्या उत्त्पत्तीचे केंद्र ठरत आहे. यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून कमी होणाऱ्या डेंग्यू रुग्णांची संख्या डिसेंबर महिना तोंडावर आला असतानाही कमी झालेली दिसून येत नाही.
पावसाळयात डेंग्यूच्या साथीचा फैलाव होतो, हे नित्याचे असून याबाबत पूर्वकाळजी न घेतल्यामुळेच आज या रोगाने थैमान घातल्याचे दिसून येत आहे. आजार पसरू नयेत यासाठी जी उपाययोजना आधीच करायला पाहिजे ती केली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणा नाही. त्यामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार, निष्काळजीपणा या अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत शहराला डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत ढकलले गेले आहे. पालिकेने आता युद्धपातळीवर डेंग्यूचा सामना करण्यासाठी कंबर कसली असली तरी डेंग्यूने आधीच हातपाय पसरले आहेत. मागील वर्षी डेंग्यूचे ३५२ रुग्ण आढळून आले होते, या वर्षी रुग्णांची संख्या नोव्हेंबर महिन्यातच ३०० वर गेली आहे. साथींना अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. पण डास निर्मूलनावरील मोहीम अबेटसारख्या किटकनाशकाच्या फवारणीपर्यंतच मर्यादित आहे. यातच हे कीटकनाशक प्रभावहिन असल्याने त्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. क्वचितच होत असलेली धूरफवारणीचाही प्रभाव डासांवर होत नाही. डेंग्यूचा प्रकोप असतानाही सार्वजनिक विहीर, नळ परिसरात पाण्याचे डबक्यांकडे संबंधित झोनचे लक्ष गेलेले नाही. डासांच्या उत्पत्तीला हे डबके पोषक ठरल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. विशेष म्हणजे, तक्रार करूनही एकमेकांकडे बोट दाखविण्यापलीकडे काहीच होत नाही. यामुळे मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाकडून ज्या घरांची तपासणी झाली त्याच घरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. (प्रतिनिधी)
टीबी वॉर्डाचे मैदान
राजाबाक्षालगत असलेल्या टीबी वॉर्डाच्या मैदानात सार्वजनिक विहीर आहे. ही विहीर धंतोली झोनच्या हद्दीत येते. परंतु विहिरीच्या पाण्याचा वापर मोटार बसवून हनुमाननगर झोन हद्दीतील राजाबाक्षावासी करतात. यासाठी विद्युत जोडणी धंतोली झोनने करून दिली आहे. विहिरीवरही नळ बसविण्यात आले आहेत. या पाण्याचा उपयोग धुणी-भांडी करण्यापासून ते वाहने धुण्यापर्यंत केला जातो. विशेष म्हणजे, विहीरवर मोटारपंप बसविण्यापूर्वी सांडपाणी वाहून जाण्याचे सौजन्य हनुमानगरझोनने दाखविले नाही. यामुळे परिसरातच नाही तर पाण्याचे डबके मेडिकल चौक रस्त्यापर्यंत साचलेले असते. या संदर्भाची माहिती दोन्ही झोनच्या झोनल अधिकाऱ्यांना आहे, परंतु अद्यापही उपाययोजना नाही.
यशोधरानगर
यशोधरानगर मुख्य रस्त्यावर जलवाहिनीला गळती लागून वर्ष झाले. परंतु संबंधित विभागाचे लक्ष नाही. रस्त्याच्या कडेला दोन ठिकाणी पाण्याचे मोठे डबके निर्माण झाले आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरात डेंग्यूसोबत मलेरियाचे रुग्ण वाढत आहे. या समस्येच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता विजय खवसे यांनी झोनमध्ये तक्रार केली. अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली, परंतु अद्यापही समस्यांचे निराकरण झालेले नाही.

Web Title: The nuggets of mosquitoes originated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.