अणुऊर्जा देशाला स्वावलंबी करेल!
By Admin | Updated: March 14, 2015 02:01 IST2015-03-14T02:01:50+5:302015-03-14T02:01:50+5:30
औष्णिक, जल आणि पवनऊर्जेच्या निर्मितीला नैसर्गिक मर्यादा आहेत. ऊर्जा विकासाच्या क्षेत्रात प्रयत्नांची गरज असून, देशाला स्वावलंबी करायचे असेल
अणुऊर्जा देशाला स्वावलंबी करेल!
यवतमाळ : औष्णिक, जल आणि पवनऊर्जेच्या निर्मितीला नैसर्गिक मर्यादा आहेत. ऊर्जा विकासाच्या क्षेत्रात प्रयत्नांची गरज असून, देशाला स्वावलंबी करायचे असेल तर अणुऊर्जाच त्याला पर्याय ठरू शकतो, असे प्रतिपादन अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईचे सचिव डॉ. आर.के. सिन्हा यांनी शुक्रवारी येथे केले.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित ‘एनर्जी फॉर टुमारो’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माँ सरस्वती आणि जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष खासदार विजय दर्डा होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायन टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. व्ही.एस. सपकाळ, एनआयटी वारंगलचे डॉ. एस.एच. सोनोवने, संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. सिन्हा म्हणाले, देशात ऊर्जा क्षेत्रात विकासाची मोठी संधी आहे. परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढते तापमान व पर्यावरणाचा धोका आम्हाला लक्षात घ्यावा लागेल. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने विकासात पुढे जावे लागेल. यवतमाळ येथे व्याख्यानासाठी खासदार विजय दर्डा यांनी १० महिन्यांपूर्वीच निमंत्रण दिले होते. त्या वेळी यवतमाळ प्रवासाबद्दल माहिती घेतली असता तेथे रेल्वेने जावे लागेल, असे सांगण्यात आले. तेव्हा दोन दिवस एक रात्र व्यर्थ जाईल का, असा विचार मनात आला. मात्र यवतमाळात आलो आणि मन प्रसन्न झाले.
येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणास्थळावर नतमस्तक होताना मनाला विशेष शांती मिळाली. प्रेरणास्थळ हे शो-पीस अथवा पर्यटनस्थळ नाही, तर खरोखरच प्रेरणा देणारे स्थळ होय. ज्या लोकांनी देशासाठी आपले सर्वस्व दिले त्या महान व्यक्तींचे नाव आजही आम्ही घेतो. त्यातीलच जवाहरलालजी दर्डा एक आहेत. या परिसराच्या विकासासाठी त्यांनी जे कार्य केले ते अतुलनीय असल्याचे डॉ. सिन्हा म्हणाले. देशातील अणुऊर्जेच्या विकासाची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी डॉ. होमी भाभा यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
खासदार विजय दर्डा म्हणाले, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, विजय भटकर, होमी भाभा, रघुनाथ माशेलकर आदी मंडळी सामान्य कुटुंबातच जन्माला आली. आपल्या संघर्षातून त्यांनी देशासाठी महान कार्य केले. मात्र आजच्या तरुणांतील संघर्ष करण्याची इच्छाशक्ती संपत चालली आहे. संघर्षातूनच सर्वोच्च स्थानी पोहोचता येऊ शकते, यासाठी तरुणांनी संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी डॉ. व्ही.एस. सपकाळ, प्रा.डॉ. एस.एच. सोनोवने यांनीही विचार व्यक्त केले. डॉ. आर.के. सिन्हा यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले़ (नगर प्रतिनिधी)