आता वॉर्डनिहाय निवडणुका होणार

By Admin | Updated: December 20, 2014 03:05 IST2014-12-20T03:05:46+5:302014-12-20T03:05:46+5:30

गेली १० वर्षे मुंबई महापालिका वगळता राज्यातील २५ महापालिकांमध्ये राबवली जाणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एका वॉर्डातून एकच नगरसेवक

Now ward wise elections will be held | आता वॉर्डनिहाय निवडणुका होणार

आता वॉर्डनिहाय निवडणुका होणार

नागपूर - गेली १० वर्षे मुंबई महापालिका वगळता राज्यातील २५ महापालिकांमध्ये राबवली जाणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एका वॉर्डातून एकच नगरसेवक निवडून देण्याची जुनी पद्धत पुन्हा अमलात आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी रात्री घेण्यात आला आहे.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी वॉर्डनिहाय निवडणूक पद्धत बंद करून एका प्रभागातून दोन-तीन नगरसेवक निवडून देण्याची पद्धत सुरू केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण लागू केल्यानंतरही वॉर्ड रचनेच्या थेट निवडणुकीत महिला उमेदवार पराभूत होतात. त्यामुळे महिलांचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रमाण वाढवण्याकरिता देशमुख यांच्या काळात प्रभाग रचनेचा निर्णय झाला होता. मात्र गेल्या १० वर्षांत विविध महापालिकांमध्ये एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून येत असल्याने त्या प्रभागाची जबाबदारी परस्परांवर ढकलत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता राज्य सरकारने पुन्हा जुनी वॉर्ड पद्धत अमलात आणण्याचे ठरवले आहे. आता एका वॉर्डातून एकच नगरसेवक निवडून येईल व जनतेला नागरी सुविधा पुरवण्यास बांधील राहील. अनेक महापालिकांमधील नगरसेवकांनी प्रभाग रचनेची पद्धत बंद करण्याची मागणी केली होती. मागील काँग्रेस सरकारच्या काळात तसा प्रस्ताव तयार झाला होता, मात्र त्या सरकारने निर्णय घेतला नव्हता. (विशेष प्रतिनिधी)

> अध्यादेश काढणार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला असला, तरी सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने याबाबतच्या कायद्यात दुरुस्ती करण्याचे विधेयक सभागृहात मंजूर करणे अपेक्षित होते. परंतु लागलीच ते शक्य नसल्याने आता अधिवेशन संपल्यावर सरकार अध्यादेश काढून ही नवी पद्धत लागू करणार आहे.

Web Title: Now ward wise elections will be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.