आता कोकण रेल्वे मार्गावर घातपाताचा प्रयत्न
By Admin | Updated: February 14, 2017 20:04 IST2017-02-14T19:56:33+5:302017-02-14T20:04:33+5:30
कणकवली तालुक्यातील खारेपाटण नजीकच्या चिंचवली येथे कोकण रेल्वेच्या रुळावर जॉगल प्लेट (लोखंडी) ठेवून घातपात

आता कोकण रेल्वे मार्गावर घातपाताचा प्रयत्न
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 14 - कणकवली तालुक्यातील खारेपाटण नजीकच्या चिंचवली येथे कोकण रेल्वेच्या रुळावर जॉगल प्लेट (लोखंडी) ठेवून घातपात करण्याचा अज्ञाताचा प्रयत्न उघडकीस आला आहे.मात्र मालगाडीने ही प्लेट तुटल्यामुळे अनर्थ टळला आहे. ही घटना सोमवारी दुपारी २.५४ च्या सुमारास निदर्शनास आली. या घटनेने कोकण रेल्वे प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने याबाबत कणकवली पोलिसात याबाबत मंगळवारी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे अधिक वृत्त असे की, कोकण रेल्वे मार्गावर खारेपाटण चिंचवली नजिक सोमवारी दुपारी २.५४ च्या दरम्यान मुंबई-मंगलोर मालगाडी जात असता या मालगाडीचे चालक यू.व्ही.नाईक यांच्या ही प्लेट रूळावर ठेवल्याचे निदर्शनास आले. ही जॉगल प्लेट रेल्वे रुळावर ठेवली असल्याची माहिती ज्युनियर इंजिनियर गुरूदेव गवस यांना दूरध्वनीवरून दिली. त्यानुसार गुरूदेव गवस यांनी रेल्वे रुळाची पाहणी केली असता या प्लेटचे मालगाडीने तुकडे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या बाबतची माहिती वैभववाडी रेल्वे स्थानकाचे ज्युनियर इंजिनियर गुरूदेव धानू गवस (२४) यांनी मंगळवारी कणकवली पोलिसात दिली आहे. रेल्वेला अपघात करण्याच्या उद्देशाने कुणी तरी अज्ञाताने ही प्लेट रेल्वे रुळावर ठेवली होती. अज्ञाताविरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कणकवली पोलीस अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
मोठा अनर्थ घडला असता
कोकण रेल्वे प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून ही प्लेट मालगाडीने तुटली. जर एक्सप्रेस गाडी या वेळेला गेली असता तर मोठा अनर्थ घडला असता. कोकण रेल्वे मार्गावर चौकट कोकण रेल्वे मार्गावर घातपाताचा प्रयत्न मुंबई आणि परिसरात रेल्वे रूळावर लोखंडी रॉड टाकून रेल्वे अपघात घडविण्याच्या प्रयत्न गेले काही दिवस सुरू आहेत. तसा काहीसा प्रयत्न कोकण रेल्वे मार्गावर करण्याचा डाव सोमवारी उघडकीस आला. सुदैवाने मालगाडीच्या चालकाच्या प्रसंगावधनामुळे रॉड तुटून गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला.