आता मुंबईच्या चकरा नाही...
By Admin | Updated: October 30, 2014 00:51 IST2014-10-30T00:51:01+5:302014-10-30T00:51:01+5:30
राज्य सरकारशी संबंधित कुठलेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. मुंबईत जाऊनही मुख्यमंत्री भेटतीलच याची खात्री नव्हती. गडचिरोली, मेघळाटसारख्या दुर्गम

आता मुंबईच्या चकरा नाही...
विदर्भवासीयांच्या आशा पल्लवीत : नागपुरातच सुटणार प्रश्न
नागपूर : राज्य सरकारशी संबंधित कुठलेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. मुंबईत जाऊनही मुख्यमंत्री भेटतीलच याची खात्री नव्हती. गडचिरोली, मेघळाटसारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना तर मुंबईला जाणे अधिकच गैरसोयीचे होते. आता मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यामुळे या सर्व अडचणी दूर होतील, विदर्भातील नागरिकांचे प्रश्न येथे नागपुरातच सुटतील, असा विश्वास विदर्भवासीयांना वाटत आहे.
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचे शासन दरबारी अनेक विषय प्रलंबित असतात. ते विषय निकाली काढण्यासाठी त्यांना बऱ्याच चकरा माराव्या लागतात.
अनेकांची अक्षरश: दमछाक होते तर अनेकजण निराश होऊन विषय सोडून देतात. आता मात्र नागपूरचा मुख्यमंत्री झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा दिला होता.
त्यांनी वेळोवेळी विधानसभेत विदर्भाच्या अनुशेषावर आवाज उठविला. विदर्भावरील अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. रस्ते, वीज, पूल यासाह पायाभूत सुविधा देण्याची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली.
विदर्भातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रातील प्रश्नांना त्यांनी हात घातला. आता त्यांच्याच हाती राज्याची सूत्रे आल्यामुळे विदर्भावर होणारा प्रशासकीय अन्याय थांबेल, नागरिकांची कामे होतील, विकासाला चालना मिळेल, अशी वैदर्भीयांना अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
नागपूरच्या घरीही वाढणार वर्दळ
फडणवीस २७६, त्रिकोणी पार्क येथील घरी असले की त्यांना भेटण्यासाठी एकच गर्दी असायची. आपल्या समस्या घेऊन मोठ्या संख्येने लोक त्यांच्याकडे यायचे. लोक येताना विनंती अर्ज, निवेदने घेऊन यायचे. त्यांना सकारात्मक आश्वासन मिळायचे. त्या सर्वच आश्वासनांची पूर्ती व्हायचीच असे नाही. कारण ते विरोधी पक्षात होते. ते निर्णय घेण्यासाठी सरकारला बाध्य करण्यासाठी प्रयत्न करू शकत होते, पण स्वत: निर्णय घेऊ शकत नव्हते. त्यामुळे मर्यादा होत्या. आता ते स्वत: मुख्यमंत्री राहतील. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या गर्दीतील प्रत्येकालाच आपले काम, अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वास असेल.