आता जबाबदारी कोल्हापूरकरांची...महालक्ष्मीचा इतिहास बदलतोय ! भाग - ५

By Admin | Updated: September 17, 2014 23:49 IST2014-09-17T23:15:21+5:302014-09-17T23:49:54+5:30

भाविकांना जाग : चुकीचा प्रसार थांबविण्याच्या मालिकेसाठी ‘लोकमत’चे अभिनंदन---महालक्ष्मी की अंबाबाई..

Now the responsibility of Kolhapurkar ... Mahalaxmi's history is changing! Part - 5 | आता जबाबदारी कोल्हापूरकरांची...महालक्ष्मीचा इतिहास बदलतोय ! भाग - ५

आता जबाबदारी कोल्हापूरकरांची...महालक्ष्मीचा इतिहास बदलतोय ! भाग - ५

इंदुमती गणेश- कोल्हापूर -ज्या देवीचे दर्शन घेतल्याशिवाय कोल्हापूरकरांचा दिवस सुरू होत नाही, त्या देवीचे खरे माहात्म्य परस्थ भाविकांपर्यंत पोहोचविणे व मराठमोळ््या कोल्हापूरचे दाक्षिणात्यीकरण थांबविणे ही जबाबदारी प्रत्येक कोल्हापूरवासीयांची आहे. प्राचीन शिलालेख, धार्मिक ग्रंथ, पुराभिलेखागारमधील कागदपत्रे, इतिहास संशोधकांनी केलेला अभ्यास यांपैकी कोणत्याही ग्रंथांत अंबाबाईला तिरूपती देवस्थानशी जोडण्यात आलेले नाही. या मालिकेमुळे देवीचा खरा इतिहास पुन्हा प्रकाशात आला याबद्दल वाचक, जाणकार, मंदिर अभ्यासक, इतिहास संशोधकांसह नागरिक ‘लोकमत’चे अभिनंदन करीत आहेत.
भारत ही देवदेवतांची भूमी आहे. त्यायोगे श्रद्धेय भावनेतून एका देवस्थानने दुसऱ्या देवस्थानला किंवा शक्तिपीठाला महावस्त्र (शालू) पाठविणे ही पद्धत फार जुनी आहे. फक्त त्याला चुकीच्या धार्मिक संबंधांनी जोडले गेले की, त्या स्थानाचा मूळ इतिहास पुसला जाण्याचा धोका असतो, अंबाबाईबाबतही सध्या हेच घडत आहे. विष्णूने आई म्हणून ज्या देवतेची उपासना केली, तिचा पत्नी म्हणून होणारा प्रसार आताच नाही थांबविला तर भविष्यात ते कधीच शक्य होणार नाही.
ही मालिका प्रसिद्ध करून देवीचा खरा इतिहास पुन्हा प्रकाशात आणल्याबद्दल नागरिकांनी ‘लोकमत’चे विशेष आभार मानले. गेली कित्येक वर्षे आम्ही ही गोष्ट पटवून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो; पण आता पुराव्यांनिशी ती प्रकाशात आली. या देवीचा खरा इतिहास समजला, आता तरी चुकीचा प्रचार थांबेल, अशा शब्दांत नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. शुभम शिरहट्टी या शालेय विद्यार्थ्यापासून श्रीपूजक, देवस्थान समितीचे सदस्य, मूर्ती व मंदिर अभ्यासक, इतिहास संशोधक, जादूगार गुरुनाथ, उजळाईवाडीचे सुनील माने, सांगलीचे बाळासाहेब लोखंडे, सदानंद पेटकर, प्रताप नाईक यांच्यासह महिला, तसेच नागरिकांनी दूरध्वनी व पत्रांद्वारे अभिनंदन केले. (क्रमश:)


महालक्ष्मी की अंबाबाई..
ज्या आदिशक्तीने अन्य देवतांची निर्मिती केली, ती देवता म्हणजे ‘महालक्ष्मी’. या शक्तीने असुरांचा संहार केला म्हणून ती जगदंबा किंवा अंबाबाई. कोल्हापूरवासीयांनी, छत्रपतींनी देवीला अंबाबाई रूपातच पूजले म्हणून आजही या देवीला महालक्ष्मी नाही तर अंबाबाईच म्हणतात. मंदिरावरदेखील ‘अंबाबाई मंदिर’ अशीच पाटी आहे.

संदर्भ सूची...
कोल्हापूरच्या या देवीचे खरे स्वरूप मंदिरातील प्राचीन शिलालेखा, ताम्रपटातूनदेखील प्रकट होते. या मालिकेसाठी ‘दुर्गासप्तशती’, ‘करवीर माहात्म्य’ या प्रमाण ग्रंथांबरोबरच इतिहास संकलन समितीने प्रकाशित केलेल्या ‘युगयुगीन करवीर दर्शन’ या ग्रंथाचा संदर्भ घेण्यात आला. डॉ. सुभाष देसाई यांनी ‘महालक्ष्मी की अंबाबाई’ या पुस्तकात या देवीचे महालक्ष्मीकरण कसे झाले हे रोखठोकपणे मांडले आहे. वा. रा. धर्माधिकारी लिखित ‘करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी’, सुहास जोशी यांच्या ‘करवीरनिवासिनी माहात्म्य’, पुराभिलेखागार कार्यालयातील जुने दस्तावेज, छत्रपती घराण्याची कागदपत्रे या सगळ््यांत देवीचे माहात्म्य मांडले आहे. मात्र, यांपैकी एकाही ग्रंथात किंवा शिलालेखांत तिरूपती बालाजीचा उल्लेख नाही. फक्त तिरूमला विद्यापीठाच्या वेंकटाचल माहात्म्य व तिरूपती देवस्थानच्या ‘तिरूचानुरू श्री क्षेत्र महिमा’ या तेलगू ग्रंथात विष्णूने लक्ष्मीच्या पुनर्प्राप्तीसाठी अंबाबाईची आराधना केल्याचा उल्लेख आहे.

महत्त्व अबाधित राहील
काहीजण असाही युक्तिवाद करतात की, यामुळे कोल्हापूरचा विकास होणार असेल तर काय हरकत आहे?...पण, ते हे लक्षात घेत नाहीत की, तीर्थक्षेत्र म्हणून या मंदिराचा विकास करण्यासाठी तिरूपतीचा आधार कशाला घ्यायला हवा? कारण देवीचे धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. शिवाय कोल्हापूरची मराठमोळी संस्कृती, धार्मिक-सांस्कृतिक परंपरा, राजर्षी शाहू महाराज आणि ऐतिहासिक वारसा याच्या जोरावर एक तीर्थक्षेत्र, त्याचबरोबर पर्यटन केंद्र म्हणून विकास करता येऊ शकतो. लोकप्रतिनिधी, देवस्थान समिती आणि अन्य संबंधितांनी याचा विचार करून या मंदिराचे दाक्षिणात्यीकरण थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, तरच साडेतीन शक्तिपीठांमधील एक असलेल्या आद्यशक्ती महालक्ष्मीचे महत्त्व अबाधित राहील.

Web Title: Now the responsibility of Kolhapurkar ... Mahalaxmi's history is changing! Part - 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.