आता सहज वाचा तबल्याचे बोल!

By Admin | Updated: December 26, 2014 02:07 IST2014-12-26T02:07:35+5:302014-12-26T02:07:35+5:30

शास्त्रीय संगीत व नृत्यमैफलींची रंगत वाढवितानाच एक स्वतंत्र तालवाद्य, अशी ओळख असलेल्या तबल्याचे बोल आता अधिक सुबोध शैलीत लिपीबद्ध झाले आहेत

Now read it easily! | आता सहज वाचा तबल्याचे बोल!

आता सहज वाचा तबल्याचे बोल!

शर्मिष्ठा भोसले, औरंगाबाद
शास्त्रीय संगीत व नृत्यमैफलींची रंगत वाढवितानाच एक स्वतंत्र तालवाद्य, अशी ओळख असलेल्या तबल्याचे बोल आता अधिक सुबोध शैलीत लिपीबद्ध झाले आहेत. औरंगाबादचे प्रयोगशील तबलावादक संजीव शेलार यांनी संशोधनातून स्वतंत्र ‘शेलार लिपी’ प्रत्यक्षात आणली आहे.
प्राचीन अभिजात परंपरा टिकवून असलेले भारतीय शास्त्रीय संगीत गुरू-शिष्य परंपरेतून वृद्धिंगत झाले आहे. यात गुरू-शिष्याला देतो ते ज्ञान बहुतेकदा मौखिक स्वरूपातच पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित झाले. अनेकांनी लिहून ठेवलेल्या रचना न समजल्याने त्या काळाच्या ओघात नामशेष झाल्या.
आजवर तबल्यावर बरेच संशोधन, लिखाण झाले असले तरी अधिक सर्वसमावेशक व सोपी लिपी शोधण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत शेलार म्हणाले की, भारतीय शास्त्रीय संगीतातील पारंपरिक ज्ञानाचे जतन करतानाच त्याचे प्रवाहीपण टिकवून ठेवण्याचाच हा प्रयत्न आहे. एखादा तबलावादक तबला वाजविताना एकच कायदा दर वेळी नव्या पद्धतीने वाजवू शकतो. तबल्याची रचना दर वेळी तशीच वाजेल असे नाही. तसे अपेक्षितही नाही. या मर्यादेत बंदिश, रचना लिहिताना त्याचे अजून परिणामकारक लिखाण व्हावे असे वाटले. सध्या प्रचलित असणाऱ्या पं. भातखंडे व पं. पलुस्कर या लिप्या प्रामुख्याने कंठसंगीतासाठी आहेत. कालांतराने तबल्याच्या रचना लिपीबद्ध करण्यासही त्या वापरल्या जाऊ लागल्या. तबल्याचे शास्त्र व रचना पूर्णपणे गणितावर आधारित आहे. या प्रचलित लिपींमध्ये शब्दसमूह तोडून लिहावा लागतो. त्यामुळे रचनेचे सौंदर्यही हरविते. यात भाषेसाठी लिपी नाही, तर लिपीसाठी भाषा वापरली जात आहे.
रचनाकाराला अपेक्षित असलेले वाचणाऱ्यापर्यंत अचूक पोहोचण्यासाठी सुधारित लिपीची गरज असल्याचे मला जाणवले. प्रचलित लिपींचा अभ्यास करून, त्यातील त्रुटी दूर करीत अधिक शास्त्रोक्त लिपी मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

 

Web Title: Now read it easily!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.