आता पोलिसांच्याही सुट्टीचे कॅलेंडर !
By Admin | Updated: April 19, 2017 03:20 IST2017-04-19T03:20:34+5:302017-04-19T03:20:40+5:30
राज्यात कार्यरत असलेल्या दोन लाखांवर पोलिसांसाठी एक खूशखबर आहे. त्यांच्या दैनंदिन ड्युटी, बंदोबस्ताचे ज्याप्रमाणे वेळापत्रक बनविले जाते

आता पोलिसांच्याही सुट्टीचे कॅलेंडर !
जमीर काझी, मुंबई
राज्यात कार्यरत असलेल्या दोन लाखांवर पोलिसांसाठी एक खूशखबर आहे. त्यांच्या दैनंदिन ड्युटी, बंदोबस्ताचे ज्याप्रमाणे वेळापत्रक बनविले जाते, तसे त्यांना अर्जित रजा, सुट्टी मिळावी, यासाठीही प्रत्येक पोलीस ठाण्यात आता सुट्टीचे कॅलेंडर बनविले जाणार आहे. प्रत्येक पोलिसाला आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी साप्ताहिक सुट्टी आणि वर्षातून किमान एकदा १५ दिवस अर्जित रजा त्यांना मिळणार आहे.
येत्या आर्थिक वर्षापासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे कॅलेंडर बनविण्यात यावे, असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना दिलेले आहेत. त्याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल बनवून मुख्यालयाला पाठवावयाचा आहे.
राज्यात २ लाख १० हजारांवर पोलिसांचा फौजफाटा आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे विविध सण, उत्सव, निवडणुका व आपत्कालीन परिस्थितीमुळे बंदोबस्तात पोलिसांना हक्काच्या साप्ताहिक सुट्टी व रजांवरही अनेक वेळा गदा येते. मात्र, प्रत्येक पोलीस ठाण्यात ड्युटीचे नियोजन व्यवस्थित करण्यात आल्यास, अपवादात्मक परिस्थिती वगळल्यास पोलिसांची सुुट्टी, रजा रद्द करण्याची गरज भासत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यासाठी २०१७-१८ या वर्षासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी, प्रत्येक अंमलदाराच्या १५ दिवसांच्या अर्जित रजेचे नियोजन आतापासून करावयाचे आहे. त्याच वेळी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या साप्ताहिक सुट्टीवर गदा येऊ
नये, यासाठी पुरेपूर खबरदारी घ्यावयाची आहे.
एका दिवशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मनुष्यबळापैकी १० टक्क्यांहून अधिक अंमलदार रजेवर असणार नाहीत, याची काळजी घेऊनच रजेचे कॅलेंडर बनवायचे असून, त्याबाबतचा दर महिन्याचा पाच तारखेला अहवाल संबंधित घटकप्रमुख व उपअधीक्षकांकडे प्रभारी अधिकाऱ्यांनी सादर करावयाचा आहे.
पोलीस आयुक्त व अधीक्षकांनी आपापल्या कार्यक्षेत्राच्या अखत्यारित त्याबाबतचे नियोजन करून घ्यावयाचे आहे. प्रभारी अधिकाऱ्यांकडून हे काम करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर, अर्जित रजेप्रमाणेच गणेशोत्सवाच्या काळातील बंदोबस्तामुळे रजा घेता येत नसल्याने, त्या धनार्जित रजेमध्ये वर्ग करून मंजूर कोषागार कार्यालयातून रक्कम जमा करण्यात येतील. त्यामुळे दिवाळीवेळी त्यांना ते पैसे वापरणे शक्य होणार आहे.
प्रत्येक पोलिसाला हक्काची रजा मिळावी, यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील पोलिसांनी सुट्टीचे कॅलेंडर बनविले आहे. त्याच धर्तीवर राज्यातील आयुक्तालये व अधीक्षकांनी कार्यक्षेत्रात नियोजन करण्याची सूचना अपर महासंचालक (प्रशासन) प्रज्ञा सरवदे यांनी केली आहे.
कामचुकारांवर शिस्तभंगाची कारवाई
अर्जित रजेच्या कॅलेंडरमधून कामचुकार, गैरहजर, निलंबित अंमलदारांना वगळावयाचे आहे. एखाद्याच्या घरी लग्न समारंभ, गंभीर आजारासारखी परिस्थिती उद्भवल्यास, त्यांना अर्जित रजेला वगळून वाढीव रजा मंजूर केली जाईल, अन्यथा जाणीवपूर्वक गैरफायदा घेणारे, रजा वाढविणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
पर्यायी नियोजनही करा
प्रत्येक पोलिसांना कुटुंबीयांसमवेत काही वेळ व्यतित करता यावा, यासाठी त्यांच्या सुट्टीचे कॅलेंडर बनविण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. मात्र, त्यांना रजेवर सोडताना तत्कालीन परिस्थिती, त्याच्या कामाचे पर्यायी नियोजन या बाबींचाही विचार करावयाचा आहे.
- सतीश माथुर, पोलीस महासंचालक