आता आॅनलाइन अर्जाचे धडे
By Admin | Updated: October 9, 2015 01:08 IST2015-10-09T01:08:22+5:302015-10-09T01:08:22+5:30
केडीएमसी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्या तीन दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही. पितृपक्ष असल्याने आणि आॅनलाइन

आता आॅनलाइन अर्जाचे धडे
डोंबिवली : केडीएमसी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्या तीन दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही. पितृपक्ष असल्याने आणि आॅनलाइन अर्ज भरावा लागणार असल्याने अनेक उमेदवारांनी अद्याप अर्ज भरलेला नाही. ही बाब महापालिकेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आता ९ व १० आॅक्टोबर रोजी आॅनलाइन अर्ज भरण्यासंदर्भातले प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महापालिकेच्या या घोषणेमुळे ‘वरातीमागून घोडे’ अशी टीका यंत्रणेवर होत आहे.
डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात तर कल्याणमध्ये अत्रे रंगमंदिरात हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे जनसंपर्क विभागाने जाहीर केले. संध्याकाळी ५च्या सुमारास त्याला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. ही सुविधा महापालिकेच्या संबंधित विभागाने आधीच दिली असती तर अधिक सोईचे झाले असते, अशी चर्चा इच्छुकांमध्ये सुरू होती. आॅनलाइन अर्ज भरण्याची ही पहिलीच वेळ असल्याने काही चुकले तर अर्ज रद्द होईल, अशी भीती उमेदवारांमध्ये असल्याने अर्ज भरण्यासाठी कोणी तज्ज्ञ आहे का? याच्या शोधातही अनेक जण आहेत. तशी तज्ज्ञ व्यक्ती असल्यास अर्ज भरण्याचा मोबदलाही मिळेल, असेही सांगण्यात येत आहे.
सहारियांनी घेतली रवींद्रन यांची भेट
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे.एस. सहारिया यांनी गुरुवारी कल्याणमध्ये केडीएमसी निवडणूकप्रमुख ई. रवींद्रन यांची भेट घेतली आणि तयारीचा आढावा घेतला. रवींद्रन यांनी त्यांना नियोजनासंदर्भात माहिती दिली. तसेच व्होटर स्लीप ही बीएलओंमार्फत दिली जाणार असल्याचे सांगितले. जास्तीतजास्त मतदानासाठी मतदार जागृती करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले.
सहारिया यांनी आचारसंहिता भंग होतो की नाही, याची पाहणी केली. कोणती विशेष काळजी घेतली आहे, याचा आढावा घेतला. कल्याणमध्ये बिर्ला कॉलेज, मुरबाड रोड, बैलबाजार, स्टेशन परिसर आदी ठिकाणी; तर डोंबिवलीत टंडन रोड, कल्याण रोड, पश्चिमेचा काही भाग, रेतीबंदर रोड, गोपी सिनेमा, सुभाष रोड, डोंबिवली विभागीय कार्यालयाला भेट दिली.
मतदान केंद्रांची पाहणी
अतिसंवेदनशील-संवेदनशील क्षेत्रच २००५, २०१०च्या निवडणुकांत घोषित नसल्याने त्याबाबतची या वेळी काय स्थिती आहे, याची विचारणा केली; तसेच या वेळेस मतदान अधिक होण्याची शक्यता असल्याने काही मतदान केंद्रांचीही त्यांनी पाहणी केली.
निलंबित सचिन पोटे यांची आता पत्रकबाजी
केडीएमसी निवडणुकीच्या धामधुमीत सत्तेचे वर्चस्व दाखवण्यासाठी भाजपाने जे षड्यंत्र सुरू केले आहे, ते योग्य नाही. त्यातच, ते राजकीय दबावतंत्र वापरून साम, दाम, दंड, भेद या अनुषंगाने राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नाही. माझा न्यायालयीन लढा मी देईनच, पण ही तर माझी राजकीय हत्या असल्याची टीका निलंबित नगरसेवक सचिन पोटे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांविरोधात मी आचारसंहितेचा भंगाची तक्रार केली. त्याचा सूड म्हणून तातडीने कारवाई करण्यात आल्याचेही मत त्यांनी मांडले. पत्रक काढत ‘मी निवडून येण्याचा धसका त्यांनी घेतला. जनप्रक्षोभानंतर कारवाई करण्यास सांगतात, हे किती योग्य आहे, असे पत्रक काढून त्यांनी निषेध केला आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.