आता अधिकाऱ्यांनाही करावे लागणार कामांचे नियोजन
By Admin | Updated: April 4, 2017 03:11 IST2017-04-04T03:11:09+5:302017-04-04T03:11:09+5:30
मुंबई महापालिकेत कामगार कपातीचे सूतोवाच अर्थसंकल्पातून करणाऱ्या आयुक्त अजय मेहता यांनी आता अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले

आता अधिकाऱ्यांनाही करावे लागणार कामांचे नियोजन
मुंबई : मुंबई महापालिकेत कामगार कपातीचे सूतोवाच अर्थसंकल्पातून करणाऱ्या आयुक्त अजय मेहता यांनी आता अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी वर्षभरातील कामांचा कालबद्ध अजेंडाच सादर करण्याची त्यांनी ताकीद दिल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.
विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मासिक बैठक आयुक्त घेत असतात. या बैठकीत सर्व साहाय्यक आयुक्तांनी हजेरी लावली. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याने कामांचे नियोजन व आराखडा सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. यामध्ये उद्यानांपासून सार्वजनिक शौचालयापर्यंत सर्व नागरी कामांची आखणी कशी करण्यात आली आहे, याचे सादरीकरण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. (प्रतिनिधी)
>असा आहे वर्षभराचा अजेंडा
आयुक्तांनीच ठरवून दिलेल्या काही कामांवर अहवाल सादर करण्यास साहाय्यक आयुक्तांना बजावण्यात आले आहे. यामध्ये पुढील वर्षभरात सुशोभित होणारी
उद्याने, सुशोभित होणारी वाहतूक बेटे व रस्ते दुभाजक, स्मशानभूमी सुधारणा,
दवाखाने-प्रसूतिगृहे-महापालिकेच्या जुन्या इमारती इत्यादींची सुधारणा व दुरुस्तीचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष २०१७-१८ दरम्यान तलाव परिसर व महत्त्वाचे परिसर येथील सुधारणा
नाल्याचे प्रस्तावित रुंदीकरण व नाल्यांच्या प्रवाहातील अडथळे दूर करणे
ज्या परिसरांमध्ये मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे नाही, अशा परिसरांमध्ये मलनि:सारण वाहिन्या टाकणे याबाबतची माहिती व नियोजन, आपल्या भागामध्ये नव्याने बांधण्यात येणारी सार्वजनिक शौचालये, तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती
महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये असणाऱ्या पाणी साठवण टाक्यांची साफसफाई उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत करून घ्यावी. तसेच या पाणी साठवण टाक्यांतील पाण्याची आरोग्याच्या दृष्टिकोनातून नियमितपणे तपासणी करून घ्यावी, असेही आदेश आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत.