आता मनीआॅर्डरही होणार इतिहासजमा!
By Admin | Updated: March 20, 2015 01:28 IST2015-03-20T01:28:25+5:302015-03-20T01:28:25+5:30
आप्तस्वकीयांना पैशांसह ख्यालीखुशाली कळविण्याची व्यवस्था असलेली टपाल विभागाची मनीआॅर्डर सेवा बंद होणार असल्याचे संकेत केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहेत़

आता मनीआॅर्डरही होणार इतिहासजमा!
नीलेश शहाकार- बुलडाणा
दोन वर्षांपूर्वी टेलिग्राफचा कट्ट कडकट्ट आवाज थांबल्यानंतर आता आप्तस्वकीयांना पैशांसह ख्यालीखुशाली कळविण्याची व्यवस्था असलेली टपाल विभागाची मनीआॅर्डर सेवा बंद होणार असल्याचे संकेत केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहेत़
माहिती व तंत्रज्ञानाचा विकास झालेला नव्हता तेव्हा मनीआॅर्डर ही गावभागापासून ते शहरापर्यंत आप्तस्वकीयांना पैसे पाठविण्याची विश्वासार्ह व्यवस्था होती़ अनेक गावांत मनीआॅर्डर घेऊन येणाऱ्याची आतुरतेने वाट पाहिली जात असे़ अनेक बाया-बापुड्या पोस्टमनकडून मनीआॅर्डरच्या फॉर्मवर लिहून दिलेला खुशालीचा मजकूर वाचवून घेत असत़ नातेवाइकाच्या खुशालीचा निरोप ऐकल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून यायचे़ या व्यवस्थेवर अनेक पिढ्या पोसल्या, अनेकांचे भवितव्य घडले़ ती मग शिक्षणासाठी वडिलांनी मुलाला पाठविलेली, भावाने बहिणीला राखी पौर्णिमेची वा भाऊबिजेची पाठविलेली ओवाळणी असो अशा अनेक सण व उत्सवांमध्ये मनीआॅर्डरला तर सुगीचे दिवस असत़ आता अनेक सेवा लोकांना उपलब्ध झाल्या़ एटीएम, आॅनलाइन बँकिंगमुळे मनीआॅर्डर सेवेतून टपाल खात्याला महसूल मिळेनासा झाला. परिणामी, ही सेवा थांबविण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतला आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगातील स्पर्धेत टिकाव धरू न शकल्याने १०० वर्षांनंतर टेलिग्राफ सेवा बंद करण्यात आली़ तीच अवस्था मनीआॅर्डर सेवेची झाल्याचे दिसून येते़
जुने मनीआॅर्डर फॉर्म न विकण्याचे आदेश माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्यानुसार ६ फेबु्रवारीपासून जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये जुन्या मनीआॅर्डरची विक्री थांबविण्यात आली आहे. मनीआॅर्डर सेवा बंद करण्यासंदर्भात स्पष्ट आदेश नाही.
- महम्मद ऐजाज शेख ईस्माईल, पोस्ट मास्तर, बुलडाणा डाक विभाग