आता पुरुषांवरही आली आहे घरगुती कामे करण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 05:51 IST2018-10-19T05:51:37+5:302018-10-19T05:51:41+5:30
मुंबई : घरगुती कामे केवळ महिलांनीच का करावी? पुरुषांनीही ही कामे करण्याची वेळ आली आहे. घरातली कामे पुरुष का ...

आता पुरुषांवरही आली आहे घरगुती कामे करण्याची वेळ
मुंबई : घरगुती कामे केवळ महिलांनीच का करावी? पुरुषांनीही ही कामे करण्याची वेळ आली आहे. घरातली कामे पुरुष का करू शकत नाहीत? असे म्हणत उच्च न्यायालयाने बुधवारी दोन भावडांना ‘स्त्री-पुरुष’ समानतेचा धडा दिला.
‘घरातल्या स्त्रीवरच घरातल्या सर्व कामांची जबाबदारी का टाकली जाते?’ असे न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने संतापत म्हटले. दोन अविवाहित भावांनी त्यांच्या विवाहित बहिणीविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. विवाहित बहिणीने किमान एक तास तरी आजारी आईची काळजी घ्यावी. तसे निर्देश तिला द्यावे, अशी विनंती दोन्ही भावांनी न्यायालयाला केली.
आजारी आईची काळजी घेण्यासाठी दोन्ही मुलांना नोकरी सोडावी लागली. मुलगी जबाबदारीपासून पळ काढत आहे, हे दुर्दैव आहे. आजारी आईची काळजी घेण्यासाठी व आईशी संबंधित घरगुती कामे करण्यासाठी मुलीला दिवसातील केवळ एक तास माहेरच्यांसाठी देण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती दोन्ही भावांच्या वकिलाने उच्च न्यायालयाला केली.
भावांची ही मागणी विचित्र असल्याचे म्हणत न्यायालयाने म्हटले की, विवाहित बहिणीने तिचे घर सोडून तुमच्या घरी काम करण्यासाठी यावे, अशी अपेक्षा का करता? जर तुम्हाला बहीण नसती तर तुम्ही काय केले असते? तुम्ही बहिणीला सांगण्यापेक्षा स्वत:चे काम स्वत:च का करू शकत नाही? किंवा घरकाम करण्यासाठी कोणाला तरी ठेवा, असे न्यायालयाने म्हटले.