तिवारींकडे आता शासनाचे मिशन

By Admin | Updated: July 23, 2015 01:58 IST2015-07-23T01:58:12+5:302015-07-23T01:58:12+5:30

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दाहक वास्तव स्थानिक प्रसार-माध्यमांपासून बीबीसीपर्यंत आणि न्यायालय व सरकारसह विविध व्यासपीठांवर गेली

Now the government's mission to Tiwari | तिवारींकडे आता शासनाचे मिशन

तिवारींकडे आता शासनाचे मिशन

यदु जोशी, मुंबई
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दाहक वास्तव स्थानिक प्रसार-माध्यमांपासून बीबीसीपर्यंत आणि न्यायालय व सरकारसह विविध व्यासपीठांवर गेली १५ वर्षे सातत्याने मांडणारे सामाजिक कार्यकर्ते किशोर तिवारी हे आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मिशनचे पहिले संचालक असतील.
सूत्रांनी सांगितले की आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील २२ लाख शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेंतर्गत २ रुपये किलो दराने गहू, तर ३ रुपये किलो दराने तांदळाचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अटी शिथिल करण्यात येणार असून, या योजनेत आणखी इस्पितळांची नोंदणी करण्यात येणार आहे. या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी तिवारी यांच्यावर असेल. या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे कामही तिवारी यांच्या नेतृत्वात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी असलेले तिवारी हे विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष आहेत. ते मूळचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते. त्यानंतर काही वर्षे ते भाजपाचेही पदाधिकारी होते. पुढे त्यांनी भाजपामधून बाहेर पडत विदर्भ जनआंदोलन समिती स्थापन केली. तेंदुपत्ता मजुरांच्या आंदोलनाने ते प्रकाशात आले. त्यानंतर त्यांनी शेतकरी आत्महत्या हा विषय लावून धरला. विदर्भात होणाऱ्या प्रत्येक शेतकरी आत्महत्येची माहिती त्यांनी जगासमोर आणली. असंख्य शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनी माहिती घेतली. एवढ्यावरच न थांबता या आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा अभ्यास करून त्यांनी शासनाला प्रचंड पत्रव्यवहार केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक न्यायालयीन लढे दिले. आता तिवारी यांच्यावर अमरावती विभागातील ५, नागपूर जिल्ह्यातील १ आणि मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या मिशनची जबाबदारी देण्यात येणार आहे.

Web Title: Now the government's mission to Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.