अब अच्छे दिन आयेगे, उद्धव - राज भेटीवरुन शिवसेनेचे सूचक विधान
By Admin | Updated: November 18, 2014 11:23 IST2014-11-18T10:50:49+5:302014-11-18T11:23:38+5:30
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीनंतर अब अच्छे दिन आयेगे असे सूचक विधान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात करण्यात आले आहे.
अब अच्छे दिन आयेगे, उद्धव - राज भेटीवरुन शिवसेनेचे सूचक विधान
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीनंतर अब अच्छे दिन आयेगे असे सूचक विधान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसेची युती व्हावी यासाठी शिवसेना अनुकूल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी राज ठाकरे शिवतीर्थावर गेले होते. तिथे राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. याविषयी मंगळवारी सामनामध्ये 'अब अच्छे दिन आयेगे' या मथळ्याखाली बातमी छापण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेची ठोस भूमिका मांडण्यात आली नाही. मात्र या दोन्ही भावांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमं आणि कार्यकर्त्यांमध्ये उद्धव - राज यांच्या एकत्र येण्यावर चर्चा रंगल्याचे म्हटले आहे. भाजपाने यापुढे शिवसेनेकडे आशेने बघू नये असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सामनामधून दिला होता. आता 'अच्छे दिन आयेगे' असे सांगत उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करण्याचे संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे.