आता करा रात्री ११.४५ पर्यंत आरक्षण
By Admin | Updated: September 24, 2015 02:14 IST2015-09-24T02:14:12+5:302015-09-24T02:14:12+5:30
इंटरनेटद्वारे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आता रात्रीच्या वेळी १५ मिनिटे जादा मिळणार आहे. रात्री साडेअकरा ते मध्यरात्री साडेबारा अशी एक तास इंटरनेट आरक्षण सेवा बंद केली जाते

आता करा रात्री ११.४५ पर्यंत आरक्षण
मुंबई : इंटरनेटद्वारे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आता रात्रीच्या वेळी १५ मिनिटे जादा मिळणार आहे. रात्री साडेअकरा ते मध्यरात्री साडेबारा अशी एक तास इंटरनेट आरक्षण सेवा बंद केली जाते व उर्वरित वेळेत आरक्षण सेवा उपलब्ध असते.
आता मात्र रात्री साडेअकरा ते मध्यरात्री साडेबाराऐवजी रात्री पावणेबारा ते मध्यरात्री साडेबारापर्यंत इंटरनेट आरक्षण सुविधा बंद असेल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे ट्रेन सुटणाऱ्या स्टेशनांवरील करंट तिकीट बुकिंगच्या आरक्षण वेळेतही वाढ करून पंधरा मिनिटे जादा वेळ तिकीट काढण्यासाठी मिळणार आहे. याची अंमलबजावणी तत्काळ करण्यात आली असून, हा निर्णय देशभरातील रेल्वेसाठी लागू होत असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटे इंटरनेटद्वारे मोठ्या प्रमाणात आरक्षित केली जातात. दररोज साडेपाच ते सहा लाख तिकिटे इंटरनेटव्दारे काढली जात असून, त्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एकूणच इंटरनेटव्दारे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता त्यांना तिकीट आरक्षणात जादा वेळ देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.