आता फेसबुकवरही करा तक्रारी!
By Admin | Updated: August 28, 2014 03:13 IST2014-08-28T03:13:45+5:302014-08-28T03:13:45+5:30
पोलीस दलाचे सक्षमीकरण करतानाच आधुनकीकरणावरही भर देण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) आता स्वत:चे फेसबुक पेज तयार केले

आता फेसबुकवरही करा तक्रारी!
मुंबई : पोलीस दलाचे सक्षमीकरण करतानाच आधुनकीकरणावरही भर देण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) आता स्वत:चे फेसबुक पेज तयार केले आहे. प्रवाशांना काही तक्रारी, सूचना असल्यास ते या पेजवर नोंदवू शकणार आहेत. त्याची त्वरित दखल घेऊन त्यावर कारवाई केली जाईल, असे रेल्वे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. रेल्वे पोलीस अधिक बळकट करतानाच त्यात काही बदल करण्यात येत असल्याचे रेल्वे पोलीस आयुक्त (लोहमार्ग) रवींद्र सिंगल यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंबई रेल्वे पोलिसांची वेबसाइट त्याचबरोबर हरवलेल्या व्यक्तींकरिता शोध वेबसाइटची माहिती सांगतानाच त्यात बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. हरवलेल्या तसेच लोकल अपघातात मृत्युमुखी पडलेल्या, पण ओळख न पटणाऱ्यांची माहिती तसेच फोटो शोध वेबसाइटवर टाकले जातात. या वेबसाइटमध्येही बदल करण्यात येणार असल्याचे सिंगल यांनी सांगितले. तसेच रेल्वे पोलिसांची वेबसाइटही आकर्षित करण्यात आली आहे. सोशल नेटवर्किंगमध्ये आणखी एक पाऊल टाकतानाच रेल्वे पोलिसांचे फेसबुक पेज सुरू करण्यात आले असून, त्यावर तक्रारी आणि सूचना नोंदवू शकतात. त्याची त्वरित दखल घेण्यात येईल आणि त्यावर कार्यवाही केली जाईल, असे सिंगल म्हणाले. या फेसबुक पेजवर फोटो आणि व्हिडीओही डाऊनलोड करण्याची सुविधा आहे. एखादा गुन्ह्याचा किंवा आरोपीचा फोटो यावर टाकू शकता. ही
वेबसाइट बुधवारपासून केल्याचेही ते म्हणाले.
एनएसएसही राहणार तैनात
प्रवाशांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या सूचना आणि तक्रारी ऐकण्यासाठी प्रत्येक स्थानकावर एनएसएसचे दोन जण तैनात केले जाणार आहेत. यासाठी एनएसएससोबत दोन बैठकाही झाल्या असल्याचे सिंगल यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर प्रत्येक स्थानकावर एनएसएसचे जवान तैनात केले जाणार आहेत. गर्दीच्या वेळेत हे तैनात असतील, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)