आता प्रति घर आकारणार करमणूक शुल्क
By Admin | Updated: June 13, 2014 03:16 IST2014-06-13T03:16:59+5:302014-06-13T03:16:59+5:30
प्र्रत्येक टीव्ही संचामागे वसूल करण्यात येणारा करमणूक कर आता घरटी एक जोडणी मानून आकारण्यात येणार आहे.

आता प्रति घर आकारणार करमणूक शुल्क
मुंबई : प्र्रत्येक टीव्ही संचामागे वसूल करण्यात येणारा करमणूक कर आता घरटी एक जोडणी मानून आकारण्यात येणार आहे. याबाबतचे महाराष्ट्र करमणूक शुल्क सुधारणा विधेयक गुरुवारी विधान परिषदेत संमत करण्यात आले. यात कर न भरणाऱ्या केबलचालकाकडून ५० हजार रुपये दंड आकारणीची सुधारणा झाली.
महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी हे विधेयक मांडले. करमणूक कर न भरणाऱ्या केबलचालकांकडून पाचशे ते एक हजार रुपयांचा दंड आकारण्याऐवजी ही रक्कम २५ हजार रुपये करावी, अशी सुधारणा मूळ सुधारणा विधेयकात होती. परंतु विधानसभेत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दंडाच्या रकमेत वाढ सुचवून ती ५० हजार रुपये करावी, अशी मागणी केली व ती मान्य झाली. त्यानंतर हे सुधारित विधेयक विधान परिषदेत मांडले. महानगरांपासून तालुक्यापर्यंत केबल नेटवर्कर्ची मध्यवर्ती पद्धती असावी, प्रक्षेपण अचानक बंद करणे, महत्त्वाच्या घडामोडींच्या वेळी जाहिराती लावणे, कुटुंबाने एकत्रितपणे पाहणे शक्य नाही अशा गोष्टी दाखविणे अशा प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न या विधेयकात आहे, असे धस यांनी सांगितले. काही घरात दोन-दोन दूरचित्रवाणी संच आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक संचामागे, जोडणीमागे करमणूक कर घेणे अन्यायकारक आहे. हा कर प्रत्येक घरामागे घ्यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. करमणूक कर गोळा करण्याची जबाबदारी केबलचालकावर टाकायची आणि कर गोळा करून भरण्यास विलंब झाला तर चालकाला दंड आकारायचा हे योग्य नाही. त्यापेक्षा शासनाने थेट गोळा करावा, असेही ते म्हणाले. त्यानंतर धस यांनी प्रत्येक घरामागे कर आकारण्याचे जाहीर केले. दिवाकर रावते, रामदास कदम, नीलम गोऱ्हे आदींनी चर्चेत भाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)