आता बंगले, दालनांसाठी लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 05:28 IST2016-07-11T05:28:56+5:302016-07-11T05:28:56+5:30
फडणवीस सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता मनाजोगती दालने आणि बंगले मिळविण्यासाठी नव्या मंत्र्यांची लगबग सुरू झाली आहे.

आता बंगले, दालनांसाठी लगबग
मुंबई : फडणवीस सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता मनाजोगती दालने आणि बंगले मिळविण्यासाठी नव्या मंत्र्यांची लगबग सुरू झाली आहे.
मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या दहा नव्या मंत्र्यांपैकी बहुतांश मंत्र्यांना मंत्रालयाच्या नवीन इमारतीतच दालन हवे आहे. त्यासाठी शपथविधी उरकताच आपल्या विश्वासू सहकारी, कार्यकर्त्यांकडे नव्या इमारतीतील संभाव्य दालनांचा अंदाज घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. नवीन इमारतीत कोणत्या मजल्यावरील कोणते दालन रिकामे आहे, आजूबाजूला कोणते मंत्री आहेत याचा धांडोळा घेतला जात आहे. काही उत्साही स्वीय सहायकांनी तर शपथविधीच्या दिवशी पाहणीचे काम उरकले. कोणते दालन घ्यावे, कधी पदभार स्वीकारावे याबाबत सल्लेही दिले जात आहेत. कोणता मजला अपशकुनी नाही अथवा अमुक ठिकाणच कसे चांगले, याची साद्यंत वर्णने केली जात आहेत. काही मंत्र्यांच्या सहायकांनी सामान्य प्रशासन विभागात त्यादृष्टीने विचारणाही केली.
एका नव्या मंत्र्यांच्या सहायकाने तर मलबार हिल परिसरातच बंगला घेण्याचा आग्रह धरल्याचे समजते. मंत्रालयाशेजारी बंगला घेतल्यास साहेबांचे कार्यकर्ते बंगल्यातच मुक्काम ठोकतील. या कार्यकर्त्यांमुळे काहीतरी गडबड होणार त्यापेक्षा मलबार हिलवरील बंगला घेतल्यास कार्यकर्त्यांचा ओघ कमी असेल, असा युक्तिवाद या सहायकाने केला. (प्रतिनिधी)
मंत्री आस्थापनेसाठी अधिकाऱ्यांची मोर्चेबांधणी
नव्या मंत्र्यांकडे स्वीय सहायक, खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी आदी पदांवर वर्णी लागावी यासाठी शासकीय अधिकाऱ्यांंनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जातीपासून आपल्याच गावचे, जिल्ह्यातले, भागातले अशी ओळख दिली जात आहे. मंत्र्याचे विश्वासू सहकारी, कार्यकर्त्यांकडे आमच्यासाठी थोडं शब्द टाका, अशी गळ घातली जात आहे.एका वजनदार माजी मंत्र्याच्या पीएसने नवीन मंत्र्यांच्या निकटवर्तीयांना फोनवर अनाहूत सल्ले देण्याचा कार्यक्रम चालविला आहे. मंत्री आस्थापनेवर चांगले अधिकारी घेतले पाहिजेत. हवे तर मला सांगा. मी प्रामाणिक व कार्यक्षम अधिकाऱ्यांची नावे सुचवतो, अशी बतावणी सुरू केली आहे.या पीएने एका मंत्र्यांला शुभेच्छा देण्यासाठी फोन करून अनाहुत सल्ले देण्यास सुरुवात केली. त्यावर तुम्ही काही सांगायची गरज नाही. कोणाला घ्यायचे अथवा नाही, हे मला चांगले कळते, अशा शब्दांत या पीएसला फटकारल्याची खमंग चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती.