आता मेलवर मिळणार वीज बिल
By Admin | Updated: August 24, 2016 02:46 IST2016-08-24T02:46:21+5:302016-08-24T02:46:21+5:30
मीटर रिडिंग, डाटा फिडिंग, प्रिंटिंग आणि वितरण यामुळे विलंब झाल्यास वीज बिल ग्राहकांना उशिरा मिळते.

आता मेलवर मिळणार वीज बिल
कळंबोली : मीटर रिडिंग, डाटा फिडिंग, प्रिंटिंग आणि वितरण यामुळे विलंब झाल्यास वीज बिल ग्राहकांना उशिरा मिळते. त्याचबरोबर दैनंदिन कामाच्या व्यापात बिल भरणा करण्याचा ग्राहकांना विसर पडतो. यामुळे अनेकदा अतिरिक्त शुल्क भरावे लागते, अथवा वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की येते. महावितरणने या सर्व गोष्टींवर तोडगा काढला असून आता ग्राहकांना थेट ई-मेलवर बिल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर बिलासंदर्भातील माहिती एसएमएसद्वारे कळविण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वीजवितरण आणि ग्राहकांमधील समन्वय वाढेल तसेच थकबाकीचे प्रमाण सुध्दा कमी होईल, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
महावितरण कंपनीकडून ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. त्याचबरोबर मीटरचे रिडिंग घेवून त्यांना वीज देयके पाठविणे, वीजबिल वसूल करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे आदी कामे करावी लागतात. मात्र अनेकदा बिले उशिराने येत असल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो.
जुनाट आणि जीर्ण वाहिन्यांमुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने देखभाल दुरुस्तीसंदर्भातही ग्राहकांचा तक्रारींचा पाऊस सुरुच असतो. वेळेवर वीजबिल न आल्याने थकबाकीचे प्रमाण वाढते. यामुळे ग्राहकांचे आर्थिक गणित कोलमडते. वीजबिलाच्या रिडिंग आणि वितरणामध्ये महावितरणने नवनवीन प्रयोग केलेले आहेत. आॅन द स्पॉट फोटो बिल पध्दत वापरण्यात आली त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या. अनेकदा बिल गहाळ होत असल्याने नेमके बिल किती? कधी भरणा करायचा?याबाबत ग्राहकांना समजत नाही. कित्येकदा वीजबिल आले तरी ते कुठे तरी कानाकोपऱ्यात पडलेले असते त्यामुळे ग्राहकांच्या लक्षात राहत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून महावितरण कंपनीने ई-मेलवर वीज बिल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मोबाइलवर एसएमएसव्दारे बिलाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था केली आहे.
हल्ली जवळपास सर्वच ग्राहक मोबाइल त्याचबरोबर ई-मेलचा वापर करतात. त्यामुळे खाजगी मोबाइल कंपन्याप्रमाणे वीजबिलाची माहिती होवून आॅनलाइन वीजबिल भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल, तसेच पेपरलेस कारभाराची चाचपणी सुध्दा करण्यात येईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
>ग्राहकांनी
हे करावे
वीजबिल भरणा करण्यापूर्वी बिलाच्या खाली मोकळ्या जागेत ग्राहकाने मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी लिहावा. ही माहिती अद्ययावत केल्यानंतर ग्राहकांना वीज बिलाची माहिती एसएमएसव्दारे त्यांच्या मोबाइलवर प्राप्त होईल. दिलेल्या ई-मेल आयडीवर दरमहिन्याचे वीज बिल उपलब्ध होईल.ग्राहकांच्या थकबाकीबाबत तसेच वीजपुरवठा खंडित करण्याअगोदर एसएमएसव्दारे कळविण्यात येईल.रोजच्या धावपळीत ग्राहकांना वीजबिल भरणा करण्याचे लक्षात राहत नाही. एसएमएसव्दारे वीज वितरण कंपनीला ग्राहकांना कळवण्यात येईल.
>ग्राहकांना अद्ययावत सुविधा देण्याबाबत प्रयत्न आहे. ग्राहकांना बिलाचे अपडेट मिळावे याकरिता ई-मेल आणि एसएमएसव्दारे माहिती कळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे महावितरण आणि ग्राहकांमधील समन्वय वाढेल. त्याचबरोबर थकबाकी कमी होईल.
- डी.बी. गोसावी,
कार्यकारी अभियंता,
महावितरण