आता रेल्वेतही मिळणार ‘बेबी’ फूड
By Admin | Updated: June 9, 2016 00:53 IST2016-06-09T00:53:40+5:302016-06-09T00:53:40+5:30
स्तनदामाता आणि त्यांच्या मुलांसाठी आता रेल्वेमध्येच बेबी फूड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आता रेल्वेतही मिळणार ‘बेबी’ फूड
पुणे : रेल्वेस्थानक तसेच रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या स्तनदामाता आणि त्यांच्या मुलांसाठी आता रेल्वेमध्येच बेबी फूड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘जननी सेवा’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे अनौपचारिक उद्घाटन बुधवारी (दि. ८) केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे केले. त्यानुसार रेल्वेच्या पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा आणि मिरज या रेल्वे स्थानकांवर हे फूड उपलब्ध करून दिले जाणार आहे, तर त्यानंतर पुण्याहून देशभर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविले आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तसेच स्थानकांवर बेबी फूड उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती, तर हे बेबी फूड प्रवासा दरम्यान सोबत ठेवण्यात आले तरी, स्थानक अथवा गाडीमध्ये गरम पाणी तसेच गरम दूध उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे लहान मुलांना घेऊन प्रवास करणे स्तनदामातांना बेबी फूडसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता या उपक्रमा अंतर्गत रेल्वेच्या खानपान केंद्रामध्ये स्तनदामातांच्या बाळांसाठी सेरेलॅक, गरम पाणी, गरम दूध उपलब्ध करून दिले जाईल.