नवप्रकाश योजनेचा ७.५० हजार ग्राहकांना लाभ!
By Admin | Updated: May 29, 2017 00:53 IST2017-05-29T00:53:50+5:302017-05-29T00:53:50+5:30
अकोला परिमंडळ : एकूण १ कोटी ९७ लाखांची थकबाकी भरली!

नवप्रकाश योजनेचा ७.५० हजार ग्राहकांना लाभ!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : थकीत वीज देयकांमुळे कायमस्वरूपी खंडित झालेला वीज ग्राहकांचा उच्च व लघुदाब वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी महावितरणने नवप्रकाश योजना अमलात आणली आहे. या योजनेत २६ मेपर्यंत अकोला परिमंडळातील साडेसात हजार ग्राहकांनी थकबाकी भरून लाभ घेतला आहे.
महावितरणच्या नवप्रकाश योजनेत थकीत वीज देयकापोटी ३१ मार्च २०१६ पर्यंत कायमस्वरूपी खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी सार्वजनिक नळ योजना वगळता कृषी पंपधारक, घरगुती, वाणिज्यिक अथवा औद्योगिक, तसेच इतर वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय लोक अदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांनाही समाविष्ट करण्यात आले असून, न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा मंजूर होऊन १२ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येणार आहे.
या योजनेला थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा प्रतिसाद लाभत असून, २६ मेपर्यंत या योजनेत अकोला परिमंडळातील ७ हजार ४८९ ग्राहकांनी १ कोटी ९७ लाख ३७ हजार ६६ रुपये भरले आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील १ हजार ८७७ ग्राहकांचे ७३ लाख ३६ हजार १५०, बुलडाणा जिल्ह्यातील ४ हजार ५२५ ग्राहकांचे ९१ लाख २१ हजार ६९४, तर वाशिम जिल्ह्यातील १ हजार ८७ ग्राहकांनी भरलेल्या ३२ लाख ७८ हजार ४२२ रुपयांचा समावेश आहे. आता या योजनेचा फायदा घेण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी उरला असून, या काळात आणखी हजारो ग्राहक या योजनेचा फायदा घेण्याची शक्यता आहे.
आॅनलाइन सुविधा
या योजनेत मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ‘आॅनलाइन’ सोय असून, संबंधित ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची, याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग घेऊन थकबााकीमुक्त झालेल्या वीज ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित वीज जोडणी देण्यात येत आहे. यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येत आहे.
‘नवप्रकाश’ योजनेला मुदतवाढ
नव्या मुदतवाढीनुसार, येत्या ३१ जुलैपर्यंत ही योजना सुरू राहणार असून, १ मेपासून मूळ थकबाकीसह व्याजाची २५ टक्के रक्कम भरल्यास ८५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची रक्कम माफ करण्यात येत आहे.