दहशतवाद विरोधी पथक (ATS), कळवा युनिट, ठाणे यांनी मोठी कारवाई करत तब्बल ६-७ वर्षांपासून फरार असलेला नक्षलवादी आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅम्प्या याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध ठाणे डीवीपी युनिट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल होते.
प्रशांत कांबळे हा कलम भादंवि ३५७, ४३५, ४६७, ४६८, २२०(ब) आणि अनलॉफुल अॅक्टिविटीज (UAPA) कलम १६, १७, १८, १८(ब), २०, ३८, ३९, ४०(२) अंतर्गत गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता. तो गुन्हे दाखल झाल्यापासूनच फरार होता. दरम्यान, तो रायगड जिल्ह्यात आदिवासी पाड्यांमध्ये लपून राहत होता व स्थानिक मुलांना शिकवत होता.
त्याच्याविरुद्ध सतत अटक वॉरंट व जाहिरनामा काढण्यात आले होते. अखेर, एटीएसच्या अधिकाऱ्यांनी २ एप्रिल २०२५ रोजी रायगड येथून त्याला अटक केली. त्यानंतर ३ मे २०२५ रोजी पुणे युनिटने ताब्यात घेतले आणि त्यानंतर पुन्हा त्याला ठाणे येथे आणले गेले.
आज, ४ मे रोजी आरोपीला मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १३ मे २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास दहशतवाद विरोधी पथक करीत आहे.