अस्वच्छ १०० हॉटेलांना नोटिसा
By Admin | Updated: July 23, 2016 02:21 IST2016-07-23T02:21:33+5:302016-07-23T02:21:33+5:30
ठाणेकर आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याकरिता ज्या प्रतिथयश हॉटेलांमध्ये तेथील अॅम्बियन्स पाहून वरचेवर हजेरी लावतात

अस्वच्छ १०० हॉटेलांना नोटिसा
पंकज रोडेकर,
ठाणे- ठाणेकर आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याकरिता ज्या प्रतिथयश हॉटेलांमध्ये तेथील अॅम्बियन्स पाहून वरचेवर हजेरी लावतात, अशाबॉक्सएट, कोर्ट यार्ड, अॅम्बरोशिया, ब्ल्यू रूफ क्लब, कुं जविहार वडापाव, मंत्रा, चुल्हा, शिवप्रसाद, शिवसागर आणि समुद्रा या व अशा एकूण १०० हॉटेल, क्लबला कोकण विभाग अन्न व औषध प्रशासनाने स्वच्छतेचे निकष न पाळल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत. नवी मुंबईतील ‘बिकानेर’ आणि ‘महक’ या दोन व्यावसायिकांवर अस्वच्छतेमुळे खाद्यपदार्थ विक्रीची बंदी घातली आहे.
ठाण्यासारख्या शहरात अॅम्बियन्स पाहून हॉटेल अथवा खाद्यपदार्थांच्या दुकानांमधून खरेदी करण्याकडे कल असतो. मात्र, जेथे खाद्यपदार्थ तयार केले जातात, तेथे स्वच्छतेच्या नियमांची खुलेआम पायमल्ली केली जाते. पावसाळ्यात विविध साथींच्या आजारांनी डोके वर काढलेले असताना अस्वच्छतेमुळे दूषित अन्नपदार्थांतून विषबाधा होण्याची भीती असते. ही बाब लक्षात घेऊनच कोकण विभाग अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल, क्लब आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांची तपासणी सुरू केली आहे. बहुतांश ठिकाणी स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याने नोटिसा बजावल्या आहेत. ठाणे शहर व नवीमुंबईतील किमान ६० टक्के हॉटेलांना, तर जिल्ह्यातील इतर ४० टक्के हॉटेलांना नोटिसा बजावल्या आहेत.
>१०० व्यावसायिकांना कलम ३२ प्रमाणे सुधारण्याची संधी मिळावी म्हणून नोटिसा बजावल्या आहेत. त्रुटींची पूर्तता केल्याचे पुराव्यासह लेखी स्वरूपात निर्धारित मुदतीत सादर करायचे आहे. त्यानंतर पुन्हा विभागामार्फत त्या ठिकाणची पाहणी करण्यात येईल. नोटिसांची कार्यवाही करण्यापूर्वी व्हिडीओ शूटिंग केले असल्याने त्यांच्या अस्वच्छतेचे पुरावे उपलब्ध आहेत.
- एस.एस. देशमुख, सहआयुक्त, अन्न प्रशासन विभाग (कोकण)