शाहरूख, गौरीला हायकोर्टाची नोटीस
By Admin | Updated: September 4, 2015 01:08 IST2015-09-04T01:08:31+5:302015-09-04T01:08:31+5:30
अभिनेता शाहरूख खान, त्याची पत्नी गौरी व इतरांना उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस जारी केली़ महानगर दंडाधिकारी न्यायालयाने शाहरूखविरोधातील गर्भलिंग निदान चाचणीची

शाहरूख, गौरीला हायकोर्टाची नोटीस
अमर मोहिते , मुंबई
अभिनेता शाहरूख खान, त्याची पत्नी गौरी व इतरांना उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस जारी केली़ महानगर दंडाधिकारी न्यायालयाने शाहरूखविरोधातील गर्भलिंग निदान चाचणीची तक्रार फेटाळली आहे. त्यावर पुन्हा सुनावणी घेण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेत न्यायालयाने ही नोटीस जारी केली आहे. हे प्रकरण नव्याने सुरू झाल्यास शाहरूखच्या अडचणी वाढू शकतात.
गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत वर्षा देशपांडे यांनी शाहरूख, गौरी व इतरांविरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात खाजगी तक्रार दाखल केली होती़ त्या सुनावणीला देशपांडे हजर नव्हत्या़ त्यामुळे दंडाधिकारी न्यायालयाने ही तक्रार फेटाळून लावली़ त्याविरोधात देशपांडे यांनी अॅड़ उदय प्रकाश वारूंजीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली़
केवळ गैरहजेरीच्या कारणावरून तक्रार फेटाळणे गैर आहे़ संबंधित तक्रारीवर पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महानगर दंडाधिकारी न्यायालयाला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे़ या याचिकेत शाहरूख, गौरीला प्रतिवादी केले आहे़ न्या़ साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने शाहरूख, गौरीसह इतर प्रतिवादींना नोटीस जारी करून ही सुनावणी तहकूब केली़