‘इन्कम टॅक्स’च्या ९ हजारजणांना नोटिसा
By Admin | Updated: September 8, 2015 00:23 IST2015-09-08T00:23:52+5:302015-09-08T00:23:52+5:30
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ : कोल्हापूर विभागातून नवी एक लाख आयकर खाती करण्याचे उद्दिष्ट; करदात्यांत खळबळ

‘इन्कम टॅक्स’च्या ९ हजारजणांना नोटिसा
संदीप खवळे - कोल्हापूर आयकर कार्यालयातंर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे चार जिल्हे येतात. या जिल्ह्यांतील विविध व्यवहार केलेल्या पण आयकर विवरणपत्र न भरलेल्या नऊ हजारजणांना आयकर विभागाने पत्रे पाठविली आहेत. या पत्रांना उत्तर न दिल्यास कायदेशीर नोटिसही बजावण्यात येणार आहे.
आयकरास (इन्कम टॅक्स) उत्पन्न पात्र असूनही आयकर विवरणपत्र न भरणाऱ्यांची माहिती संकलित करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यावर्षी देशभरातून एक कोटी नवीन आयकर खाती तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कोल्हापूर विभागासाठी हे उद्दिष्ट सुमारे एक लाखाच्या आसपास आहे.
आयकर विवरणपत्र भरण्यासाठी ७ सप्टेंबर ही अंतिम मुदत होती. या पार्श्वभूमीवर आयकर कार्यालयाशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ही माहिती मिळाली. सोमवारी विवरणपत्र न भरणाऱ्यांना आयकरपात्र उत्पन्नावर दर महिना एक टक्के व्याज आकारले जाणार आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत विवरणपत्र न भरल्यास पाच हजार रूपयांचा दंड होणार आहे.
यावर्षी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने देशभरातून एक कोटी नवीन आयकर खाती उघडण्याचे उद्दिष्ट आयकर विभागाला दिले आहे. यासाठी जमीन हस्तांतरण व्यवहार, पाच लाखांवरील वाहन खरेदी, विविध कंत्राटामधून मिळालेले कमिशन, बँकेतील ठेवी, कमोडिटी बाजारातील गुंतवणूक, मोठया हॉटेलना देण्यात आलेली बिले, बचत खात्यावरील दोन लाखांपेक्षा जास्त व्यवहार, क्रेडिट कार्डवरील दोन लाखांपेक्षा जास्त व्यवहार, यासह सुमारे शंभर प्रकारच्या व्यवहारांशी संबंधित व्यवहारकर्त्यांना आयकर विभागाने रडारवर आणले आहे, अशी माहिती आयकर विभाग प्रधान आयुक्त, कोल्हापूर (रेंज -१) के. आर. मेघवाल यांनी दिली.
मेघवाल म्हणाले, आयकरास पात्र असणाऱ्या व्यवहारांची माहिती विविध संस्थाच्या माध्यमातून संकलित करण्यास आयकर विभागाने सुरू केले आहे. आतापर्यंत आयकरास पात्र असलेल्या पण आयकर विवरणपत्र न भरलेल्या नऊ हजार व्यवहारकर्त्यांना पत्रे पाठविली आहेत. या पत्रांना उत्तरे न देणाऱ्यांना कायदेशीर नोटिसा काढल्या जाणार आहेत. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी लवकर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून शिबिरे घेण्यात येणार आहेत. सहकारी संस्थानाही विवरणपत्रे पाठवणे बंधनकारक असून विवरणपत्रे भरण्यासाठी नऊ हजार पतसंस्थांना आतापर्यंत विवरणपत्र भरण्यासंबंधीची पत्रे पाठविली आहेत. आयकरास पात्र उत्पन्न असलेल्यांनी पुढाकार घेऊन विवरणपत्र भरावे. याशिवाय आयकरास पात्र नसलेल्या पण खात्यावर सतत उलाढाल करणाऱ्यांनीही आयकर विवरणपत्रे भरावित.
ई - फायलिंगचा टक्का वाढला
आयकर विवरणपत्रे आॅनलाईन भरण्याची सोय असल्यामुळे गेल्या काही वर्षात लिखित विवरणपत्र भरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
मंगळवारी सांयकाळी पाचपर्यंत कोल्हापूर आयकर विभागातील
रेंज-१ मध्ये ३५१३ लिखित आयकर विवरणपत्रे भरण्यात आली. मागील वर्षी हाच आकडा ६१८२ इतका होता.
आयकरासाठी वैयक्तिक करदात्याबरोबरच कंपनी, संस्थाही आयकराच्या कक्षेत आहेत.
सन २०१५ - १६ कररचना
२०१५ च्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार अडीच लाखांपर्यंतच उत्पन्न हे करमुक्त आहे.
अडीच ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के कर आकारला जातो.
पाच ते दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के दराने करआकारणी होते.
दहा लाखांवर ३० टक्के कर आकारला जातो.