‘इसिस’ नव्हे, प्रेयसीला सरप्राईज

By Admin | Updated: January 6, 2016 01:00 IST2016-01-06T00:58:55+5:302016-01-06T01:00:53+5:30

इंग्रजीत नावे लिहिल्याने गोंधळ : प्रयाग चिखली येथील तरुणाचा प्रेमाचा संदेश

Not this Isis, but Priycele Surprise | ‘इसिस’ नव्हे, प्रेयसीला सरप्राईज

‘इसिस’ नव्हे, प्रेयसीला सरप्राईज

कोल्हापूर : येथील कॉमर्स कॉलेजसमोरील रस्त्यावर ‘इसिस’ संघटनेच्या नावाशी साधर्म्य असणारा मजकूर आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली होती. जुना राजवाडा पोलिसांनी याप्रकरणी गोपनीय चौकशी केली असता ‘इसिस’ नव्हे, तर प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे राहणाऱ्या ‘इंद्रजित’ नावाच्या तरुणाने पे्रयसीला तिच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज देण्यासाठी दोघांच्या नावाची इंग्रजी अक्षरे लिहिल्याचे मंगळवारी स्पष्ट झाल्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले.
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जुना राजवाडा पोलिसांकडे याप्रकरणी तपास करून कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक अनिल देशमुख व त्यांच्या गोपनीय विभागाने महाविद्यालय परिसरातील तरुणांकडे गोपनीयरित्या चौकशी केली असता एका प्रेमवेड्या प्रियकराने पे्रयसीच्या वाढदिवसासाठी हा संदेश लिहिल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी त्या प्रियकरास पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे फर्मान काढले.
यावेळी त्याने आपण पुण्यात असून, गुरुवारी पोलीस ठाण्यात हजर राहतो, असे सांगितले. त्यानंतर त्याच्या पे्रयसीला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने माझा सोमवारी वाढदिवस होता. प्रयाग चिखली येथे राहणाऱ्या इंद्रजित नावाच्या तरुणाशी आपले प्रेमसंबंध आहेत. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास त्याने मोबाईलवरून मला फोन केला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, मी आता तुझ्या कॉलेजसमोर आहे. तू सकाळी कॉलेजला आल्यानंतर प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर तुला काहीतरी पाहायला मिळेल. ते तुझ्यासाठी सरप्राईज असेल, असे म्हणून मोबाईल बंद केला. सकाळी मी नेहमीप्रमाणे कॉलेजला आल्यानंतर त्याने ‘हॅप्पी बर्थ डे’ लिहून इंग्रजीमध्ये ‘आयएसआयएस’ असे लिहिले होते. त्याचे नाव इंद्रजित व माझे ‘एस’वरून नाव असल्याचे तिने सांगितले. प्रेमाचा किस्सा असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्या तरुणीचा जबाब घेऊन सोडून दिले. (प्रतिनिधी)

शहरातील कॉमर्स कॉलेजसमोरील रस्त्यावर इंग्रजीमध्ये ‘हॅप्पी बर्थ डे १५१५’ असे पांढऱ्या रंगाने लिहिले होते. परंतु वाचले तर त्यातून ‘हॅपी बर्थडे इसिस’ असाही अर्थ ध्वनीत होत होता.
काहींनी त्याचा अर्थ ‘आयएसआय-५’ असाही काढला. शेवटचा अंक ‘एस’ या इंग्रजी अद्याक्षराप्रमाणे दिसत होता. त्यामुळे तो शब्द ‘इसिस’ असा असल्याची चर्चा महाविद्यालय परिसरात सुरू झाली.

Web Title: Not this Isis, but Priycele Surprise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.