सगळेच काही भगवद्गीता वाचत नाहीत
By Admin | Updated: December 17, 2014 03:07 IST2014-12-17T03:07:57+5:302014-12-17T03:07:57+5:30
भगवद् गीतेला राष्ट्रग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि त्यांच्या सहकारी नेत्यांनी केल्याने गदारोळ उडाला

सगळेच काही भगवद्गीता वाचत नाहीत
मुंबई : भगवद् गीतेला राष्ट्रग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि त्यांच्या सहकारी नेत्यांनी केल्याने गदारोळ उडाला असतानाच, ज्या घरात भगवद् गीता असते तेथेही तो वाचला जातोच असे नसल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
भाजपा नेत्यांनी भगवद् गीतेला राष्ट्रग्रंथ बनविण्यासाठी मोर्चेबांधणी चालविलेली असताना खुद्द सरसंघचालकांनीच भगवद् गीतेचे वाचन होत नसल्याबाबतची खंत व्यक्त केली आहे. भागवत यांच्या या विधानामुळे भाजपा नेत्यांच्या मोहिमेतील हवाच निघाली.
विजय दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि सरसंघचालकांच्या हस्ते ‘समग्र वंदे मातरम्’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. मिलिंद सबनीस यांनी लिहिलेल्या सदर ग्रंथात वंदे मातरम या राष्ट्रगीताचा संपूर्ण इतिहास शब्दबध्द करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना भागवत म्हणाले की, वंदे मातरम् हे केवळ दोन शब्द नसून स्वातंत्र्य योध्यांच्या मुखातील मंत्र होते. वाचन होत नसले तरी लोकांच्या घरात पुस्तके असतात. वाचन होणार नसले तरी समग्र वंदे मातरम् घरात असून दया. किमान भावी पिढ्या वाचतील आणि
त्यातून शिकतील, असे भागवत म्हणाले. (प्रतिनिधी)