लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लोकभावनेची दिशा तुम्हाला कळली असती तर आज ही दशा झाली नसती. लोकांच्या मनात काय ते तुम्हाला कळलेच नाही, परिणामत: बाळासाहेब थोरात आज सभागृहात नाही, नाना पटोले तुम्ही तर २०८... म्हणजे थोडक्यात वाचले, असे चिमटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढले.
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी लोकांनी तुम्हाला नाकारले आहे हे वास्तव स्वीकारा, असे आवाहन विरोधकांना केले. काँग्रेसला ८० लाख मते मिळूनही १६ जागा कशा मिळाल्या, असा प्रश्न विरोधक करत आहेत. लोकसभेला आम्हाला ७३ लाख मते पडली; पण जागा ७च आल्या, तेव्हा तुम्हाला ईव्हीएम नाही आठवले का, असा सवाल त्यांनी केला.
‘कर नाही त्याला नाही डर, उसका नाम नार्वेकर’nनार्वेकर यांनी कोणाचीही तमा न बाळगता शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीवर निर्णय दिले. रामशास्त्री प्रभुणेंसारखा न्याय त्यांनी दिला. काही विश्वप्रवक्ते, भोंगे त्यांच्यावर पातळी सोडून टीका करत होते; पण नार्वेकर दबले नाहीत.
n‘कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर’ अशा रामदास आठवले शैलीतील ओळी शिंदे यांनी म्हटल्या तेव्हा सभागृहात हशा पिकला. ‘सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, योग्य न्याय देतील अध्यक्ष’ अशी कोटीही त्यांनी केली.
‘रडीचा डाव किती दिवस? आपला करेक्ट कार्यक्रम’लोकसभेला आम्ही कमी पडलो तेव्हा रडत नाही बसलो, तुम्ही विधानसभेला हरलात तर रडीचा डाव खेळत ईव्हीएमला दोष देताय. उगाच स्टंटबाजी करताय, आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, हे लक्षात घ्या, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत विरोधकांवर केली.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करतानाच्या भाषणात पवार म्हणाले की, पक्षफुटीनंतरच्या काळात विरोधकांनी ताळतंत्र सोडून नार्वेकर यांच्यावर टीका केली; पण संयमी राहून त्यांनी ऐतिहासिक निर्णय दिला.
लोकसभेला जिंकले तेव्हा गार गार वाटायचे तुम्हाला आणि आता गार वाटते की गरम वाटते ते तुमचे तुम्हीच ठरवा. लाडक्या बहिणींनी आम्हाला इथे बसविले हे लक्षात ठेवा, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.