उत्तरेकडील थंडीने रेल्वे सहल ‘गारठली’
By Admin | Updated: December 27, 2014 04:37 IST2014-12-27T04:37:54+5:302014-12-27T04:37:54+5:30
रशियन करन्सीचा भाव खाली उतरल्यामुळे तब्बल १० हजार रशियन पर्यटकांनी गोव्यातून माघार घेतली आणि यामुळे गोवा

उत्तरेकडील थंडीने रेल्वे सहल ‘गारठली’
मुंबई : रशियन करन्सीचा भाव खाली उतरल्यामुळे तब्बल १० हजार रशियन पर्यटकांनी गोव्यातून माघार घेतली आणि यामुळे गोवा येथील सर्व हॉटेल्स रिकामी झाली. त्याचा फायदा घेत २९ डिसेंबरपासून चार दिवसांची मुंबई-गोवा टूर पॅकेज आयआरसीटीसीने आखली.
उत्तर भारतात पडलेली थंडी आणि या थंडीमुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांनी गोव्याला दिलेली पसंती पाहता गोवा येथील सर्व हॉटेल्स भरली. त्यामुळे आयआरसीटीसीला एकही हॉटेल उपलब्ध न झाल्याने आयोजित मुंबई-गोवा टूर पॅकेजच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची सर्व जबाबदारी मध्य रेल्वेवर टाकली आहे. त्यामुळे रेल्वे आता पॅकेज टूरमधील ट्रेनच चालवण्याचा विचार करत असून तीदेखील प्रिमियम म्हणून चालवण्याचा विचार असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नवीन वर्षाच्या स्वागताला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग टूरिझम कॉर्पोरेशन) २९ डिसेंबरपासून चार दिवसांची मुंबई-गोवा टूर पॅकेज आखली होती. यासाठी सीएसटी, पनवेल, गोवा आणि पुन्हा त्याच ट्रेनने परत येतानाच गोव्यातील हॉटेल्स बुक करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला. त्याचप्रमाणे या पॅकेजमध्ये हॉटेल, चर्च, बीचही दाखवणार होते. प्रत्येक माणसामागे वर्गवारीनुसार (कॅटेगरी) शुल्क आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला. स्टॅण्डर्ड कॅटेगरी पाहिजे असल्यास १२,९९९ रुपये, कम्फर्टसाठी १८,९९९ रुपये आणि डिलक्ससाठी २२ हजार ९९९ रुपये आकारणी केली जाणार होती. यासाठी सर्व तयारी करतानाच त्याचे प्रसिद्धिपत्रकही आयआरसीटीसीने काढले. मात्र अचानक या टूर पॅकेजमधून माघार घेण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेला सांगण्यात आले. त्यामुळे आता ही टूर पॅकेज रद्द करून फक्त ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नवीन वर्षाच्या निमित्ताने गोव्यात जवळपास १० हजार रशियन पर्यटक उपस्थिती लावणार असल्यामुळे सर्व हॉटेल्स, बीच हाऊसफुल्लच झाली होती. मात्र ऐनवेळी रशियन करन्सीचा भाव उतरल्यामुळे सर्वच्या सर्व पर्यटकांनी त्यातून माघार घेतली. त्यामुळे याचा फायदा उचलत गोवा टूरिझम आणि आयआरसीटीसीने मुंबई-गोवा पॅकेज टूरचा निर्णय घेतला होता. मात्र उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी पडल्यामुळे तेथील पर्यटकांना येण्यास सरकारकडून मनाई करण्यात आली आहे.
त्यामुळे अनेक पर्यटकांनी गोव्याला पसंती दिल्याने सर्व हॉटेल्सचा भाव वधारला आणि आयआरसीटीसीला मिळणारी हॉटेल्स ही उत्तर भारतीय पर्यटकांना देण्यात आली. एकही हॉटेल न मिळाल्याने हे टूरपॅकेज रद्द करण्यात आले. (प्रतिनिधी)