संजीव पुनाळेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 01:36 IST2016-01-16T01:36:41+5:302016-01-16T01:36:41+5:30
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील साक्षीदारांना पत्राद्वारे धमकी दिल्याबद्दल हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अॅड. संजीव पुनाळेकर यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस

संजीव पुनाळेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा
कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील साक्षीदारांना पत्राद्वारे धमकी दिल्याबद्दल हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अॅड. संजीव पुनाळेकर यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कॉ. दिलीप पवार यांनी फिर्याद दिली आहे.
अॅड. पुनाळेकर यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शुक्रवारी सकाळी कॉ. दिलीप पवार यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना दिले होते. तेव्हा त्यांच्यासह यांच्यासह मेघा पानसरे, अॅड. विवेक घाटगे, प्रकाश मोरे हेही होते. त्यावर देशपांडे यांनी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांना कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रात्री गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.
पानसरे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबद्दल काळजी व्यक्त करणारे; परंतु अप्रत्यक्षरित्या या खटल्यातील साक्षीदारांमध्ये भीती निर्माण होईल, अशा आशयाचे धमकी देणारे पत्र ‘सनातन’च्या वतीने अॅड. पुनाळेकर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना पाठविले होते. (प्रतिनिधी)