नामकरण खपवून घेणार नाही - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: September 3, 2016 00:37 IST2016-09-03T00:37:42+5:302016-09-03T00:37:42+5:30
न्यू कफ परेड, बीकेसी अनेक्स्, न्यू वरळी अशा गोंडस नावाखाली मुंबईची खरी ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत राज्य सरकारने नियम करायला हवेत. बिल्डरांना विभागाची

नामकरण खपवून घेणार नाही - उद्धव ठाकरे
मुंबई : न्यू कफ परेड, बीकेसी अनेक्स्, न्यू वरळी अशा गोंडस नावाखाली मुंबईची खरी ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत राज्य सरकारने नियम करायला हवेत. बिल्डरांना विभागाची नावे बदलण्याचा अधिकार नाही. सरकारचे नियम, कायदे पाळावेच लागतील. इमारतीत अमक्यालाच घर मिळेल तमक्याला मिळणार नाही अशी बिल्डरांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. गृहनिर्माण धोरण जाहीर करण्याच्या निमित्ताने घाटकोपर येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मुंबईचा कोणी एकच मालक नाही. केंद्र सरकार, विमानतळ, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या जमीनी इथे आहेत. या जमीनी केंद्राच्या असल्या तरी त्यांना राज्याचे नियम लागू झाले पाहिजे. हे अधिकार गाजविणार आणि आम्ही यांची धुणीभांडी करायची का, असा सवाल करतानाच राज्य सरकारनेही मुंबईच्या विकासाबाबात पालिकेला विश्वासात घ्यायला हवे, असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आडमुठ्या धोरणामुळे मुंबईत कोणताच प्रकल्प पूर्ण झाला नाही. आघाडीच्या नेत्यांनी मुंबईकडे केवळ पैसा मिळविण्याचे मशीन म्हणूनच पाहिले. मुंबईच्या विकासाचा कोणताच निर्णय न घेता केवळ चर्चेत वेळ घालविला. ‘ये तो ट्रेलर हे, पिक्चर अभी बाकी है’, असा डायलॉग मारत आजचे गृहनिर्माण धोरण व्यापक धोरणाचा भाग आहे. पुढे टप्प्या टप्प्याने महत्वाच्या घोषणा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.