भुयारी रिंग रोड नको; बीआरटीएस पाहिजे!
By Admin | Updated: December 17, 2014 03:18 IST2014-12-17T03:18:02+5:302014-12-17T03:18:02+5:30
मुंबईच्या वाहतूक प्रणालीला विकसित करण्यासाठी केंद्राने भुयारी रिंग रोड उभारण्याबाबत पावले उचलली असतानाच वाहतूक तज्ज्ञांनी मात्र यावर टीका केली आहे.

भुयारी रिंग रोड नको; बीआरटीएस पाहिजे!
मुंबई : मुंबईच्या वाहतूक प्रणालीला विकसित करण्यासाठी केंद्राने भुयारी रिंग रोड उभारण्याबाबत पावले उचलली असतानाच वाहतूक तज्ज्ञांनी मात्र यावर टीका केली आहे. मुंबईची वाहतूक प्रणाली विकसित करायची असेल आणि सर्वसामान्यांसाठी त्याचा फायदा होणे गरजेचे असेल, तर मुंबईत बस रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम (बीआरटीएस) उभारण्यात यावी, असा सूर त्यांनी लावला आहे.
वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ब्रिज इंजिनीअर्सच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमादरम्यान केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत भुयारी रिंग रोडचे जाळे उभारण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. वाहतूक तज्ज्ञ सुधीर बदामी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईच्या लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता केवळ तीन टक्के लोकांनाच अशा प्रकल्पांचा फायदा होईल. मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरासाठी भुयारी रिंग रोडसारखे प्रकल्प फायदेशीर ठरत नाहीत, तर ७५ लाख लोकांना वाहून नेणारे रेल्वेसारखे प्रकल्प फायदेशीर ठरतात. शहरी वाहतुकीला पर्याय आहेत. हे पर्याय म्हणजे बीआरटीएस, सार्वजनिक वाहतूक प्रणाली होय. असे प्रकल्प उभारण्यावर सरकारने भर दिला पाहिजे. शिवाय मोटारगाड्यांचा वापर कमी करून लोकांनी सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर भर दिला तर साहजिकच भुयारी रिंग रोडसारखे प्रकल्प उभारण्याची गरज भासणार नाही आणि पर्यावरणाची हानीदेखील होणार नाही.
दरम्यान, सार्वजनिक वाहतूक प्रणालीसाठी केवळ वाहतूक तज्ज्ञांनी आवाज उठवून चालणार नाही, तर येथील प्रवाशांनी आवाज उठवायला पाहिजे, असेही बदामी यांनी आवर्जून नमूद केले. (प्रतिनिधी)