एमआयडीसीतील रस्त्यांची डागडुजी नाहीच

By Admin | Updated: June 30, 2016 03:21 IST2016-06-30T03:21:07+5:302016-06-30T03:21:07+5:30

एमआयडीसीचा कारभार वादग्रस्त ठरला असतानाच पहिल्याच पावसात या परिसरातील रस्त्यांची पोलखोल झाली आहे.

No road repair in MIDC | एमआयडीसीतील रस्त्यांची डागडुजी नाहीच

एमआयडीसीतील रस्त्यांची डागडुजी नाहीच


डोंबिवली : प्रोबेस कंपनीतील भीषण स्फोटामुळे एमआयडीसीचा कारभार वादग्रस्त ठरला असतानाच पहिल्याच पावसात या परिसरातील रस्त्यांची पोलखोल झाली आहे. अगोदरच नादुरुस्त असलेल्या येथील रस्त्यांवरील खड्ड्यांत रसायनमिश्रित पाणी साचलेले असल्याने त्यातून चालणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच दुचाकी वाहनचालकांना आजारांना सामोरे जाण्याची भीती सतावत आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी गतवर्षी २५ लाखांच्या निधीची तरतूद एमआयडीसीने केली होती. मात्र, त्याच वेळेत ती गावे महापालिकेत समाविष्ट झाल्याने तो निधी परत गेल्याची माहिती एका वरिष्ठ अभियंत्यांनी दिली.
पावसाच्या जेमतेम चारपाच दिवसांच्या संततधारेमुळे एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांत पाणी साचून राहिले आहे. त्यामध्ये रसायने मिसळली गेल्याने रंगीबेरंगी झालेल्या पाण्याची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.
अगोदर खड्डे बुजवा आणि ज्या कंपन्यांचे रसायन रस्त्यांवर येते, त्या कंपन्यांना नोटीस बजावा, कडक कारवाई करा, अशी अपेक्षा परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली.
पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर पडलेले रसायन दिसून आले, म्हणजे एरव्ही अशा घातक रसायनांमुळे सर्वसामान्यांना त्वचारोग, श्वसनाचे रोग का व कसे होतात, ते स्पष्ट होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
वर्षभरानंतरही दुर्लक्षच
एमआयडीसीअंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीसाठी २५ लाखांच्या निधीची तरतूद होती. पण, तो भाग आता केडीएमसीत आला. त्यास आता वर्ष झाले, परंतु वर्षभरात तेथील रस्ते, पदपथ, पायवाटांचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेनेही विशेष प्रयत्न केले नसल्याचे यावरून स्पष्ट झाले.
त्यामुळे तेथील नगरसेवक, महापालिकेच्या ई प्रभागातील अधिकारी आदींची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे.

Web Title: No road repair in MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.