आनंद हवा, उन्माद नको

By Admin | Updated: January 13, 2015 01:06 IST2015-01-13T01:06:18+5:302015-01-13T01:06:18+5:30

मकरसंक्रांत उद्यावर येऊन ठेपली आहे. या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाणघेवाण करतो. पण या सणाच्या नावाखाली पतंगबाजीचा

No pleasure, no fanfare | आनंद हवा, उन्माद नको

आनंद हवा, उन्माद नको

प्रशासनासह सामाजिक संघटनांच्या पुढाकाराची गरज
नागपूर : मकरसंक्रांत उद्यावर येऊन ठेपली आहे. या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाणघेवाण करतो. पण या सणाच्या नावाखाली पतंगबाजीचा जो उन्माद असतो त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या संस्कृतीचा आनंद साजरा करताना दुसऱ्याचा बळी घेणे किंवा जखमी करणे हे कुठेही सांगितलेले नाही. पण तरीही हे पतंगबाज रस्त्यांवर, घराच्या छतांवर अक्षरश: धुमाकूळ घालीत असतात. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा. सामाजिक संघटनांच्या पुढाकाराची आणि प्रशासनाचीही तेवढीच गरज आहे.
मकरसंक्रांतीचा सण हा नागपूर शहरातही मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाची खरेदी-विक्री केली जाते. नायलॉन मांजा हा नायलॉन धाग्यापासून तयार करण्यात येत असून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनवला जातो. त्यामुळे नायलॉन मांजा सहसा तुटत नाही व काही वर्षे तसाच राहतो.
या मांजाच्या वापरामुळे गंभीर स्वरुपाच्या जखमा होतात. अनेकांचे गळे चिरले जातात, नाक, कान व गालावर गंभीर जखमा होतात. रस्त्याने जात असलेल्या दुचाकी वाहनपालक नायलॉन मांजात अडकून गंभीर अपघाताला बळी पडतात. अशा प्रकारे नायलॉन मांजा नागरिकांच्या जीविताला व आरोग्याला धोका निर्माण करतो. तसेच नायलॉन मांजा झाडावर, विद्युत खांबावर, रस्त्यावर तसाच अडकून राहतो. त्यामुळे आरोग्यासह पर्यावरणासाठी सुद्धा तो धोकायदायक आहे.
दोघांना गमवावा लागला होता जीव
बेजबाबदार पतंगबाजामुळे गेल्या वर्षी दोन निर्दोष तरुणांचे बळी गेले होते. राहुल विश्वनाथ नागपुरे (वय २६) रा.सक्करदरा आणि दीपक नागोसे (वय २५) रा. जरीपटका अशी मृत तरुणींची नावे होती. हुडकेश्वरमधील भारतमाता नगरात राहणारा राहुल नागपुरे एमआयडीसीतील एका आॅईल कंपनीत कार्यरत होता. संक्रांतीनिमित्त राहुलच्या आई शकुंतलाबाई दर्शनासाठी सावनेरला गेल्या होत्या. बहीण माधुरीला ‘बाय’ करीत नेहमीप्रमाणे राहुल सकाळी १०.१५ च्या सुमारास दुचाकीने आशीर्वादनगरमधून निघाला. राहुलने हेल्मेट घातले होते. आशीर्वादनगरातील निशांत ट्रेडर्सजवळ अचानक धारदार मांजा राहुलच्या गळ्यावर आला. राहुलने हाताने मांजा दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकीकडे हवेतील पतंगीचा ताण आणि दुसरीकडून पतंगबाजाची ओढाताण सुरू असल्याने मांजाने ‘सुऱ्याचे’ काम केले. गळा चिरल्यामुळे राहुल दुचाकीवरून खाली पडला. ते पाहून परिसरातील नागरिक त्याच्या मदतीला धावले. त्यांनी राहुलला खासगी इस्पितळात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केले. राहुल त्याच्या आई आणि बहिणीचा एकमात्र आधार होता. ध्यानीमनी नसताना आणि कोणताही दोष नसताना त्याचा अशा पद्धतीने बळी गेल्याने त्याची आई आणि बहिणीला जबर मानसिक धक्का बसला आहे. त्याचप्रकारे जरीपटक्यातील उदय लॉनजवळ राहणारा दीपक मिस्त्री (वय २५) दुपारी २.३० च्या सुमारास घराच्या गच्चीवर चढला. पतंगीच्या नादात त्याला भानच उरले नाही आणि तो इमारतीवरून सरळ खाली पडला. आजूबाजूच्यांनी त्याला लगेच मेयोत नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. यासोबतच अनेक जणांचे गाल, कान मांजामुळे चिरल्या गेले होत
कायमस्वरूपी तोडगा निघावा; व्यापाऱ्यांची भूमिका
नायलॉन मांजाबाबत काही वर्षांपासून वाद सुरू आहे. संक्रांत आली की नायलॉन मांजावर बंदी घातली जाते. नायलॉन मांजा घातक आहे बी बाब मान्य आहे. परंतु त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. त्याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. नायलॉन मांजावर बंदी घालायची असेल तर सरसकट बंदी घालण्यात यावी. केवळ सणापुरती नको. बंदीचा निर्णय सर्वांचा विचार करून करण्यात यावा, केवळ व्यापाऱ्यांना टारगेट करण्यात येऊ नये, अशी भूमिका जुनी शुक्रवारी येथील ठोक मांजा विक्रेते राकेश शाहू यांनी मांडली. नायलॉन मांजाबाबत दरवर्षी वाद होण्याऐवजी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, परंतु त्यासंबंधात काही निर्णय घेण्यापूर्वी विक्रेत्यांची भूमिका सुद्धा समजून घ्यावी, असेही येथील जवळपास सर्वच विक्रेत्यांनी सांगितले. मांजा घातक असला तरी पतंगबाजीचा उन्माद हा अधिक घातक आहे, त्यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचेही या विक्रेत्यांनी स्पष्ट केले.
लोकमतची भूमिका
मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगबाजीच्या नावावर जो उन्माद उपराजधानीत होतो तो चीड आणणारा आहे. या पतंगबाजीमुळे ज्यांचा बळी जातो किंवा जे जखमी होतात, त्यांचे नुकसान कोणीही भरून काढू शकणार नाही. आमचा पतंग उडविण्याला विरोध नाही. पतंग उडवीत असताना नायलॉनचा मांजा, काचेचा चुरा वापरणे, ‘डीजे’चा धुमाकूळ या गोष्टींना आमचा विरोध आहे. ‘लोकमत’ची हीच भूमिका आहे. हा उन्माद असणाऱ्यांना आमचा विरोध आहे आणि ही विकृती थांबविण्यासाठी सामाजिक संघटना व नागरिकांनी समोर येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: No pleasure, no fanfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.