खेड्यांत नोटा नाहीतच
By Admin | Updated: November 11, 2016 04:28 IST2016-11-11T04:28:06+5:302016-11-11T04:28:06+5:30
बंद झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा बदलून देण्यास गुरुवारी देशभरात प्रारंभ झाला असला तरी, देशाच्या अनेक दूरवर्ती भागांत नव्या नोटा पोहोचल्याच नसल्याचे समोर आले.

खेड्यांत नोटा नाहीतच
नवी दिल्ली : बंद झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा बदलून देण्यास गुरुवारी देशभरात प्रारंभ झाला असला तरी, देशाच्या अनेक दूरवर्ती भागांत नव्या नोटा पोहोचल्याच नसल्याचे समोर आले.
नोटा बदलून घेण्यासाठी उसळलेल्या गर्दीत ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे दिसून आले. स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे ज्येष्ठांनाही रांगेत उभे राहूनच नोटा घ्याव्या लागल्या. अनेक ठिकाणी नव्या ५00 आणि २,000च्या नोटांचा साठा लवकरच संपला. कोलकात्यात एका बँकेच्या आवारात बाचाबाची झाल्याची घटना घडली.
ज्यांच्याकडे खरोखरच काळा पैसा आहे, ते काहीना काही मार्ग शोधून काढतील. सामान्य माणूस मात्र त्रास सहन करीत आहे. दैनंदिन गरजांच्या वस्तूंसाठीही पैसे नसल्यामुळे रांगेत उभे राहिल्याशिवाय आमच्या समोर दुसरा पर्यायच नाही, असे टीसीएसचे कर्मचारी कुणाल भारद्वाज यांनी सांगितले.
आमच्याकडे पैसे असूनही आम्ही जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी संघर्ष करीत आहोत. किराणा दुकानदार, बसवाले आणि स्थानिक दुकानदार हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारायला तयार नाहीत. बँकांसमोर एवढ्या रांगा आहेत की, माझा नंबर यायला ३ ते ४ तास लागतील.
-कुमकुम भार्गव, प्राथमिक शिक्षिका, दिल्ली