कोल्हापूर : कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतले तरी शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत त्याविरोधातील लढा चालूच ठेवणार असा निर्धार माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी केला.इंडिया आघाडीच्या मूक मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी महापालिकेत पत्रकारांशी संवाद साधला. शक्तीपीठ महामार्गासाठी ८६ हजार कोटी रुपये खर्च करणे म्हणजे सरकारचा चिंधीचोरपणा आहे. लाडक्या बहिणींसाठी पैसे नाहीत, ठिबक सिंचनचे तीन तीन वर्षांचे अनुदान थकित आहे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अनेक वर्षांचे पैसे दिलेले नाहीत, अनेक शासकीय योजनांच्या निधीला कात्री लावलेली असताना कोणाची मागणी नसताना हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा सरकारने घाट घातलेला आहे. '५० हजार कोटी हडप करायचे' ३० हजार कोटीत रस्ता करायचा आणि वरचे ५० हजार कोटी हडप करायचे हे होउ देणार नाही. शक्तीपीठ महामार्ग प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा हात आहे. त्यांना यातून पैसा कमवायचा आहे, ठेकेदारांना पोसण्यासाठी खासगी क्षेत्रातील अनेकांशी हितसंबंध जोपासायचे आहेत असा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला.शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न हा केवळ कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा प्रश्न नाही, शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या १२ जिल्ह्यात मी दौरा करत आहे. यवतमाळपासून प्रत्येक जिल्ह्यात याबाबत मी बैठका घेत कोल्हापुरात आलो आहे. सिंधुदुर्गातही जाणार आहे. २७ हजार एकरातील शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे.
..त्यामुळे पर्यावरणाचाही प्रश्न
माणगाव ते पट्टणकोडोली असा पूल झाल्यास बिंदू चौकात पूर आल्याशिवाय राहणार नाही. या महामार्गामुळे कोल्हापूरचे अस्तित्व नाहीसे होईल अशी भीती आहे. याशिवाय इको सेन्सेटिव्ह झोनमधून हा रस्ता जात आहे, त्यामुळे पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे हा महामार्ग होऊ देणार नाही, असे शेट्टी म्हणाले.