पुण्याची भाषा प्रमाण नव्हे
By Admin | Updated: April 4, 2015 23:36 IST2015-04-04T23:36:39+5:302015-04-04T23:36:39+5:30
पुण्याची भाषा म्हणजे प्रमाण भाषा असा समज वर्षानुवर्षे आपल्याकडे आहे. मात्र, पुण्याची भाषा प्रमाण नव्हे, असे परखड मत साहित्यिक राजन खान यांनी आज साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडले.

पुण्याची भाषा प्रमाण नव्हे
राजन खान यांचे मत : संमेलनात भाषेवर अभिरूप न्यायालय
स्रेहा मोरे - (संत नामदेवनगरी)
पुण्याची भाषा म्हणजे प्रमाण भाषा असा समज वर्षानुवर्षे आपल्याकडे आहे. मात्र, पुण्याची भाषा प्रमाण नव्हे, असे परखड मत साहित्यिक राजन खान यांनी आज साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडले.
‘दृकश्राव्य माध्यमातील संहितालेखन’ या विषयावर संमेलनात अभिरूप न्यायालय आयोजित करण्यात आले होते. या न्यायालयात आकाशवाणीच्या रसिका देशमुख, लेखक-अभिनेते संजय मोने, अभिनेते मोहन जोशी,
ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी न्यायमूर्र्तींची भूमिका बजावली. ‘मराठी भाषा’ या विषयावर मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी न्यायालयात सर्वांना बोलते केले.
सध्या अस्तित्वात असलेली मराठी भाषा मूळची मराठी नाही. या भाषेत ६० ते ७० टक्के
इतर भाषेतील शब्द सामावले आहेत. त्यामुळे आता माध्यम आणि साहित्यिकांनी भाषा टिकवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे खान यांनी सांगितले. मातृभाषेत बोललो नाही तर ती शिवी समजावी अशी भूमिका घेत प्रत्येकाने मराठीत बोलले पाहिजे, असे परखड मत संजय मोने यांनी मांडले.
पाठ्यपुस्तकातील भाषा भंपक
महाराष्ट्राचे अनेक तुकडे आहेत, त्यामुळे कोणत्याही ठरावीक भाषेला प्रमाण म्हणणे चुकीचे आहे. जो माणूस ज्या संस्कारात वाढला
ती प्रमाण भाषा असते. सध्या पाठ्यपुस्तकातील भाषा ही अतिशय भंपक असल्याची टीका राजन खान यांनी केली.
राजन खान यांचा प्रथमच सहभाग
रोखठोक बोलीसाठी प्रसिद्ध असलेले व वेळोवेळी साहित्य महामंडळाला सुनावणारे राजन खान आज प्रथमच संमेलनात सहभागी झाले होते. त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
नाट्यक्षेत्रातील संवादाबद्दल मोहन जोशी म्हणाले, आजकाल नाटकांमध्ये शॉर्टकट आणि उथळ लिखाण केले जाते. संहिता कितीही कमकुवत असली तरी संपूर्ण ताकदीनिशी ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कलाकारांना करावे लागते.
अभिरूप न्यायालयाच्या समारोपाप्रसंगी न्यायमूर्तीच्या भूमिकेत असलेले रामदास फुटाणे म्हणाले, प्रत्येकाने मातृभाषेचा बळी जाऊ नये याची काळजी घ्यावी. बालकुमार साहित्य संमेलनांची संख्या वाढविण्याची सूचनाही त्यांनी शासनाला केली. ‘रती इंग्रजीची रचू लागली, अजाण मुळाखाली माती खचू लागली’ असे आपल्या शैलीत सांगत इतर भाषांचा सन्मान करा, असा सल्लाही त्यांनी दिला.