शिक्षणाची दुकाने नको, गुणवत्ता हवी - मुख्यमंत्री
By Admin | Updated: September 24, 2016 03:41 IST2016-09-24T03:41:04+5:302016-09-24T03:41:04+5:30
शिक्षणाची केवळ दुकाने उघडून बसण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याची वेळ आली आहे

शिक्षणाची दुकाने नको, गुणवत्ता हवी - मुख्यमंत्री
पुणे : शिक्षणाची केवळ दुकाने उघडून बसण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याची वेळ आली आहे. केवळ पदव्या देऊन चालणार नाही, तर शिक्षणातून कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हायला हवी. तेव्हाच आपण एकविसाव्या शतकातील आव्हानांचा सामना करू शकू. यामध्ये शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.
माईर्स एमआयटी येथे आयोजित पहिल्या नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, की केवळ पदवी नव्हे, तर मूलभूत ज्ञानही विद्यार्थ्यांना मिळायला हवे, अशी शिक्षणपद्धती तयार करण्याची गरज आहे. आपण किती इंजिनीअर तयार केले यापेक्षा त्यांना किती ज्ञान मिळाले, हे महत्त्वाचे आहे. शिक्षण संस्थांसाठीची नियामक मंडळे कमी असायला हवीत; तसेच महाविद्यालयांना स्वायत्तता मिळावी.
देश संक्रमणातून जात असताना अनेक आव्हानांबरोबरच संधीही निर्माण झाल्या आहेत. देशातील तरुणाई ही आपली खरी ताकद आहे. २०२०मध्ये भारत जगातील सर्वांत तरुण देश असेल. पण केवळ युवाशक्तीवर भारत विश्वगुरू बनणार नाही. त्यासाठी या तरुणाईचे रूपांतर कुशल मनुष्यबळात करावे लागणार आहे. त्यासाठी तशी शिक्षणपद्धती, शिक्षक तयार करायला हवेत, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी )
>...तर शिक्षकांचेही रँकिंग
कार्यक्रमामध्ये टीचर्स काँग्रेसचे निमंत्रक प्रा. राहुल कराड यांनी शिक्षकांचे विषयनिहाय रँकिंगबाबत मांडलेल्या कल्पनेला फडणवीस यांनी लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘ही चांगली कल्पना आहे. मात्र, शिक्षणाशी संंबंधित विविध घटक आहे. त्यामध्ये शिक्षक संघटनाही आहेत. या संघटनांही रँकिंगला सहमती दर्शविली तर लगेचच समिती नेमून पुढील वर्षीपासून ही प्रक्रिया सुरू करू. लोकशाहीच्या माध्यमातूनच याचा निर्णय घेतला जाईल,’ असे फडणवीस म्हणाले.