महिन्यानंतरही कारवाई नाही
By Admin | Updated: March 2, 2016 01:21 IST2016-03-02T01:21:06+5:302016-03-02T01:21:06+5:30
आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थी मुरूड-जंजिरा येथील दुर्घटनेत दगावले. या घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे; तरीही अद्याप याप्रकरणी महाविद्यालयाचा चौकशी अहवाल तयार केलेला नाही

महिन्यानंतरही कारवाई नाही
पुणे : आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थी मुरूड-जंजिरा येथील दुर्घटनेत दगावले. या घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे; तरीही अद्याप याप्रकरणी महाविद्यालयाचा चौकशी अहवाल तयार केलेला नाही; तसेच पालकांशी संवाद साधून त्यांना मदतीचा हातही दिला गेला नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने सहलीबाबत सविस्तर नियमावली तयार केली आहे. प्रत्येक विद्यापीठाने व महाविद्यालयाने या नियमावलीनुसार सहलीचे आयोजन करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या निष्काळीपणामुळेच १४ मुलांचा मृत्यू झाला, असा आरोप पालकांनी केला असून, संबंधित दोषी प्राध्यापकांवर कारवाईची मागणी केली. त्यावर महाविद्यालयातर्फे चौकशी समिती स्थापन केली जाईल. ही समिती एका महिन्यात अहवाल तयार करेल. समितीने दिलेल्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी स्पष्ट केले होते. मंगळवारी (१ मार्च) या घटनेस एक महिना पूर्ण झाला; परंतु चौकशी समितीचा अहवाल तयार झालेला नाही. त्यामुळे या गंभीर घटनेबाबत संस्थेला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
पालक सादिक काझी म्हणाले की, महाविद्यालय प्रशासनाकडून पालकांना मानसिक दिलासा मिळाला नाही. पुण्यातील पोलीस व मुरूडच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून पालकांना वाईट वागणूक दिली गेली. एवढी मोठी घटना घडूनही कोणत्याही हालचाली केल्या जात नसतील, तर संस्थेच्या अध्यक्षांवरच कारवाई झाली पाहिजे. विद्यापीठाकडून ५० हजार रुपये विम्याची रक्कम मिळाली असून, उर्वरित रक्कम आॅनलाइन जमा होणार आहे.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीची आई शकिला सय्यद म्हणाल्या की, संस्थेतील काही प्राध्यापकांनी माझी भेट घेऊन विचारपूस केली; मात्र या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून एकाही पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही. माझी पोटची मुलगी गेली, तिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.