एनएमएमटीचा बस ट्रॅकर मोबाइल अ‍ॅप

By Admin | Updated: March 2, 2017 02:49 IST2017-03-02T02:49:14+5:302017-03-02T02:49:14+5:30

शहरातील प्रवाशांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने एनएमएमटी बस ट्रॅकर मोबाइल अ‍ॅप कार्यान्वित केला

NMMT's Bus Tracker Mobile App | एनएमएमटीचा बस ट्रॅकर मोबाइल अ‍ॅप

एनएमएमटीचा बस ट्रॅकर मोबाइल अ‍ॅप


नवी मुंबई : शहरातील प्रवाशांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने एनएमएमटी बस ट्रॅकर मोबाइल अ‍ॅप कार्यान्वित केला आहे. आयआयटीएस प्रणालीवर आधारित हा प्रकल्प दीड महिन्यात प्रत्यक्ष कार्यान्वित होणार असून अशा प्रकारचा प्रकल्प राबविणारी नवी मुंबई ही पहिलीच पालिका ठरणार आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेचे सर्व परवाने व परवानग्या सुविधा आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्रही आॅनलाइन दिले जात आहे. यानंतर आता परिवहन सुविधा अद्ययावत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून एनएमएमटी बस ट्रॅकर अ‍ॅप विकसित केला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून एनएमएमटी प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅपद्वारे प्रवाशांना जवळचा बस थांबा कोठे याची माहिती उपलब्ध होणार आहे. ज्या ठिकाणावरून बसप्रवास सुरू करावयाचा आहे तेथून कोणत्या बस कुठे जातात याची माहिती मिळणार आहे. बस किती वेळेत संबंधित बसस्टॉपवर येणार याचीही माहिती प्रवाशांना थांब्यावर उभे असताना एका क्लीकमध्ये उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅपचा रेल्वे, मेट्रो व बस सुविधेसाठी वापर करता येणार आहे. बसचे वेळापत्रक, बस थांब्यावर येणारी बस नक्की कुठे आहे, किती वेळात येणार ही सर्व माहिती तत्काळ लक्षात येणार आहे. शहरातील ८१ ठिकाणी एलईडी बोर्ड लावण्यात येणार आहेत. त्यावरही बसच्या वेळापत्रकाची माहिती देण्यात येणार आहे. लवकरच प्रवासाकरिता डिजिटल तिकिटिंग आणि स्मार्ट कार्डचा वापर सुरू करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये सद्यस्थितीमध्ये ४४५ एनएमएमटी बसेस आहेत. ही संख्या ५०० करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्पलाय बेस सर्व्हिसकडून डिमांड बेस सर्व्हिस देण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. पुढील दीड महिन्यात आयआयटीएस प्रणाली कार्यान्वित केली जाणार असून अशा प्रकारची सेवा देणारी नवी मुंबई पहिली महापालिका ठरणार आहे.
ही प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी सीबीडी बेलापूर येथील मुख्यालयामध्ये विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या ठिकाणावरून बसेसचे प्रवासी मार्ग, त्यांचा वेग, त्यांची स्थानके अशा सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. परिवहन उपक्रमाच्या बसेसचे संचलन करण्यामध्ये नियोजनबद्ध करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.
बस ट्रॅकरमध्ये काय असणार?
एनएमएमटी बस ट्रॅकरसाठी आयआयटीएस यंत्रणेचा वापर
शहरात ८१ ठिकाणी बसेसच्या वेळपत्रकाची माहिती
अ‍ॅपचा रेल्वे,मेट्रोसाठीही होणार उपयोग
प्रत्येक बसेसविषयी माहिती अ‍ॅपवर होणार उपलब्ध
बसेससाठीची प्रतीक्षा थांबणार
एमएमएमटी बस ट्रॅकर या अ‍ॅपद्वारे एनएमएमटी बस प्रवाशांना आपल्या हातातील मोबाइलवरून स्वत:च्या प्रवासाचे नियोजन करता येणे शक्य होईल. यामुळे त्यांना वाट पाहावी लागणार नाही व वेळेत बचत होणार आहे.
- तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका

Web Title: NMMT's Bus Tracker Mobile App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.